तेलगू मडेलवार ज्ञातीच्या पंचांविरुद्ध तक्रार दाखल

आंतरजातीय विवाह केल्याने दाम्पत्यासह त्याच्या कुटुंबीयांना समाजातून बहिष्कृत करण्याचा आणखी एक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी खडकी पोलीस ठाण्यात तेलगू मडेलवार ज्ञातीच्या पंचाच्या समितीविरुद्ध तक्रारअर्ज दाखल करण्यात आला.  यासंदर्भात अजित चिंचणे, महेश अंगीर, संतोष चिंचणे यांनी खडकी पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार महाराष्ट्र सामाजिक बहिष्कारापासून व्यक्तीचे संरक्षण प्रतिबंध अधिनियम २०१६ या कायद्यानुसार खडकी पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते. चिंचणे, अंगीर यांनी परजातीतील युवतीशी विवाह केला होता. त्यामुळे चिंचणे, अंगीर कु टुंबीयांना जातीतून बहिष्कृत करण्याचा निर्णय पंचसमितीकडून घेण्यात आला होता.

त्यांच्या कुटुंबीयांना समाजाकडून आयोजित के ल्या जाणाऱ्या कार्यक्रमात देखील सहभागी करुन घेतले जात नव्हते. त्यामुळे चिंचणे आणि अंगीर यांनी पंचाची भेट घेऊन समाजातून बहिष्कृत करु नका, अशी विनंती पंचांकडे वेळोवेळी केली होती. त्यामुळे त्यांनी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रदेश सचिव मिलिंद देशमुख यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर चिंचणे आणि अंगीर यांनी शनिवारी खडकी पोलीस ठाण्यात पंचसमितीविरुद्ध तक्रारअर्ज दाखल केला. दरम्यान, पद्मशाली समाजाच्या पंचांविरुद्ध दोन दिवसांपूर्वी खडक पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला होता.