न्यायालयामध्ये तीस वर्षे प्रॅक्टिस करणाऱ्या वकिलांना निवृत्ती निधी म्हणून तीन लाख रुपये देण्यात येणार आहेत. ‘अ‍ॅडव्होकेट वेल्फेअर अ‍ॅक्ट’मध्ये दुरुस्तीसाठी राज्य शासनाने मंजुरी दिली असल्याने वकिलांना निवृत्ती निधीबरोबरच अपघाती मृत्यू झालेल्या वकिलांच्या नातलगांना तीन लाख रुपये मिळू शकणार आहेत. बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाचे अध्यक्ष अ‍ॅड. हर्षद निंबाळकर यांनी याबाबतची माहिती दिली.
अ‍ॅड. निंबाळकर म्हणाले, अ‍ॅडव्होकेट वेल्फेअर अ‍ॅक्टमध्ये दुरुस्ती करण्याबाबत बार कौन्सिलकडून अनेक वर्षांपासून सरकारकडे मागणी करण्यात येत होती. वकिलांना निवृत्ती निधी, अपघाती मृत्यू झालेल्या वकिलांच्या तातलगांना ३० हजारांची नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी ही मागणी होती. मात्र, ही रक्कम अत्यल्प असल्याने ती पाच लाखांपर्यंत वाढविण्याची मागणी वकिलांनी केली होती. त्याबाबतचा प्रस्तावही देण्यात आला होता.
बार कौन्सिलकडून याबाबत राज्य शासनाकडे पाठपुरावा करण्यात आला. त्यानुसार अ‍ॅडव्होकेट वेल्फेअर अ‍ॅक्टमध्ये दुरुस्ती करण्यात आली आहे. वकिलांना निवृत्ती निधी देण्यासाठी राज्य शासनाने एक कोटी रुपये द्यावेत, अशी मागणी आता करण्यात आली आहे. अ‍ॅडव्होकेट वेल्फेअरचे सदस्य असणाऱ्या वकिलांनाच निवृत्ती निधी मिळू शकणार आहे. या सदस्यांची संख्या सध्या कमी आहे. मात्र आता ती वाढण्यास मदत होऊ शकणार आहे.