पिढय़ान्पिढय़ा डोंगराच्या कुशीत वसलेलं माळीण गाव ‘त्या’ दिवसापर्यंत कुणाच्याही गावी नव्हतं. पण ३० जुलैला डोंगर कोसळून त्याखाली गाडल्या गेल्यानंतर हे गाव उजेडात आलं. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या वारसांना चहुबाजुंनी मदतीचा ओघ सुरू झाला. पण एकदम हातात आलेल्या या पैशांनी आता वेगळेच प्रश्न निर्माण केले आहेत.
अशा वारसांना ‘आधार’ देण्यासाठी आता अनेक नातलग, आप्तेष्ट पुढे येत असल्याने मिळालेल्या मदतीचा गैरवापर होण्याचीही भीती निर्माण झाली आहे.  
माळीण दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या वारसांना राज्य व केंद्र शासनाच्या वतीने मदत देण्यात आली आहे. ही रक्कम मिळून एका कुटुंबाला कमीत कमी साडेआठ लाख, तर जास्तीत जास्त ८५ लाख रुपयांची मदत मिळाली आहे. मदत मिळालेले बहुतांश वारस १५ ते ३० या वयोगटातील आहेत. त्यामुळे त्यांना ‘आधार’ देण्याच्या नावाखाली अनेकजण पुढे सरसावत आहेत. पण यातील बहुतांश जण आर्थिक मदतीवर डोळा ठेवून असल्याने पीडितांना मिळालेल्या पैशाचा अपव्यय होण्याची भीती व्यक्त होत आहे.
या पाश्र्वभूमीवर जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी त्यासाठी पुढाकार घेतला आहे. पैशांचे योग्य नियोजन व्हावे, यासाठी तज्ज्ञ मार्गदर्शकांच्या माध्यमातून वारसांचे प्रबोधन करण्यात येत आहे. पैसे नेमके कुठे गुंतवावे व त्यातून संपूर्ण भविष्याचे नियोजन कशा पद्धतीने करावे, याचे मार्गदर्शन करण्यात येत आहे.