टीकेनंतर सत्ताधारी भाजपचा निर्णय

पालकमंत्री गिरीश बापट यांच्या वाढदिवसानिमित्त नेहरू स्टेडियम येथे नियमांचे उल्लंघन करून आयोजित करण्यात आलेली ‘नामदार चषक’ क्रिकेट स्पर्धा कडाडून टीका झाल्यानंतर आणि नियम डावलून स्पर्धेसाठी मैदान उपलब्ध न करून देण्याची ठाम भूमिका महापालिकेने घेतल्यामुळे ही स्पर्धा रद्द करण्याची वेळ सत्ताधारी भारतीय जनता पक्षावर आली.

पालकमंत्री गिरीश बापट यांच्या वाढदिवसानिमित्त ‘नामदार चषक’ क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवारपासून (१८ ऑगस्ट) या स्पर्धेला सुरुवात होणार होती. पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्तेच या स्पर्धेचे उद्घाटन होणार होते. नेहरू स्टेडियमवर स्पर्धा घेण्यासंदर्भात काही ठराव महापालिकेच्या मुख्य सभेने केले आहेत. त्यानुसार पावसाळ्याच्या कालावधीत म्हणजे एक जून ते एक ऑक्टोबर या कालावधीत मैदान उपलब्ध करून दिले जात नाही. मैदानावर सामने घ्यायचे झाल्यास क्युरेटरची परवानगी घ्यावी लागते. तसेच लेदर चेंडूवरच सामने घेणे बंधनकारक असून स्टेडियम हवे असल्यास किमान तीन महिने आधी महापालिकेकडे रीतसर परवानगी अर्ज करावा लागतो. मात्र या नियमांना फाटा देत ही स्पर्धा आयोजित करण्यात आल्याचे स्पष्ट झाले होते. स्पर्धेसाठी मैदान मिळावे यासाठी भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून नेहरू स्टेडियमच्या व्यवस्थापकांवरही दबाव टाकण्यात आला होता. त्यामुळे सत्ताधारी भारतीय जनता पक्षावर चोहोबाजूने टीका सुरु झाली होती. या पाश्र्वभूमीवर पक्षाच्या काही वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी आणि पालकमंत्री गिरीश बापट यांनीही पदाधिकाऱ्यांची कडक शब्दांत कानउघाडणी केली. त्यामुळे काही अपरिहार्य कारणामुळे ही स्पर्धा रद्द करण्यात आल्याचे आयोजकांकडून कळविण्यात आले असले तरी टीका आणि परवानगी नाकारल्यामुळेच स्पर्धा रद्द करण्याची वेळ भाजपवर आल्याचेही स्पष्ट झाले.