पाच महिन्यात गुन्हे शाखेकडे पुरुषांकडून १३० तक्रारअर्ज दाखल

पतीकडून पत्नीचा छळ झाल्याच्या अनेक घटना सातत्याने घडत असतात. तशाच पद्धतीने पुरुषांचा देखील छळ केला जातो. मात्र अशा प्रकारांबाबत पुरुषांकडून केल्या जाणाऱ्या तक्रारींचे प्रमाण तसे नगण्य होते. शहरात पत्नीकडून छळ केला जात असल्याच्या तक्रारींमध्ये आता वाढ झाली आहे. गेल्या पाच महिन्यात पुणे पोलिसांच्या महिला साहाय्य कक्षाकडे महिलांकडून केल्या जाणाऱ्या छळाबाबत पुरुषांकडून १३० तक्रारअर्ज दाखल झाले आहेत.

समाजातील एकत्र कुटुंब पद्धती लोप पावत चालली आहे. नोकरी- व्यवसायानिमित्त अनेक जण पुणे-मुंबईसारख्या मोठय़ा शहरांमध्ये स्थिरावले आहेत. पुणे शहरात माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रात नोकरीच्या संधी असून माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रात मोठय़ा संख्येने महिला आहेत. पुरुषांच्या बरोबरीने महिला कमवत आहेत. संसारात महिलांचाही मोठा हातभार लागत आहे. त्यामुळेच घरात पुरुषांच्या बरोबरीने महिलेचेही स्थान महत्त्वाचे आहे. काही वर्षांपूर्वी कुटुंबात पुरुषांचा शब्द महत्त्वाचा मानला जायचा. आता मात्र परिस्थिती बदलली आहे. पुरुषांकडून महिलांचा छळ होतो, असे ऐकिवात यायचे. पण महिलांकडून पुरुषांचा छळ केला जात असल्याच्या तक्रारी आता पोलिसांकडे येत आहेत. या तक्रारींमध्ये तथ्य आहे का नाही, हा भाग वेगळा असला तरी पुरुषांचा पत्नीकडून छळ होतो, ही बाब नाकारता येत नाही, असे निरीक्षण गुन्हे शाखेतील महिला साहाय्य कक्षाच्या पोलीस निरीक्षक संगीता पाटील यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना नोंदवले.

अशा आहेत तक्रारी..

पत्नीकडून घटस्फोटाची धमकी दिली जाते, तसेच माझा शारीरिक छळ होत आहे, मानसिक छळ होत आहे, अशी तक्रार मी पोलिसांकडे करीन अशा प्रकारच्याही धमक्या दिल्या जातात, अशा पुरुषांच्या तक्रारी दाखल झाल्या आहेत. त्या बरोबरच, तुम्ही माझा छळ करता अशी तक्रार देताना त्या तक्रारीत तुमचे आई वडील, बहिणी अशी सगळ्यांची नावे देईन अशी धमकी दिली जाते; अशा प्रकारच्या तक्रारी अधिक असल्याचे सांगण्यात आले.

अनेक महिलांना राजा-राणीचा संसार हवा असतो. संसारात पतीच्या नातेवाइकांचा, तसेच त्याच्या आई-वडिलांचा हस्तक्षेप अनेक महिलांना सहन होत नाही. कारण संसारासाठी मी देखील झटते, ही भावना महिलांच्या मनात असते. पती-पत्नी दोघेही कमावते असल्याने त्यांच्या वागण्यात थोडीशी बेफिकिरी दिसून येते. मी का सहन करायचे?, असा प्रश्न महिलांकडून उपस्थित केला जातो.पतीला बेदखल करण्याची वृत्ती दिसते किंवा त्याला फारसे महत्त्व न देता आडवे-तिडवे बोलले जाते. अशा भांडणाचे पर्यवसान घटस्फोटापर्यंत जाते.

काही प्रकरणांमध्ये फेसबुक, व्हॉट्स अ‍ॅप अशी समाजमाध्यमे संसारात वितुष्ट आणतात. एकमेकांवर संशय घेतला जातो. त्यामुळे की काय, महिला आणि पुरुषांकडून महिला साहाय्य कक्षाकडे तक्रारी दाखल करण्याचे प्रमाण वाढले आहे. पोलिसांकडून अशा तक्रारदारांचे समुपदेशन केले जाते. समुपदेशन केल्यानंतर अनेकांचे प्रश्न सुटतात. मात्र, काही जण विभक्त होण्याच्या निर्णयावर ठाम असतात, असे पोलीस निरीक्षक पाटील यांनी सांगितले.