शिक्षक आत्महत्या प्रकरण

पाषाणशाळा बंद करण्यावरून शिक्षक आणि अधिकाऱ्यांमध्ये झालेल्या वादानंतर दबावाखाली येऊन शिक्षकाने आत्महत्या केल्याप्रकरणी शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिकाऱ्यांच्या दबावाला कंटाळून पुणे जिल्ह्य़ातील हवेली येथील जिल्हा परिषदेच्या शाळेमधील प्राथमिक शिक्षक जीवन रामचंद्र वाघमारे (वय ३२ वर्षे) यांनी मंगळवारी सायंकाळी आत्महत्या केली. या प्रकरणी हवेलीच्या गटशिक्षण अधिकारी ज्योती परिहार यांच्याविरुद्ध कर्जत पोलिस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जीवन यांचे बंधू नवनाथ रामचंद्र वाघमारे (वय ३८, राहणार लोहगाव, जिल्हा पुणे) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. जीवन यांच्याजवळ आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी सापडली असल्याचे समजते.

दबाव कशासाठी?

वाघोली परिसरात जिल्हा परिषद शाळा क्रमांक१ मध्ये वाघमारे काम करत होते. या भागात ‘संतुलन’ या संस्थेच्या पाषाणशाळाही आहेत. शिक्षण हक्क कायद्यानुसार सर्व मुलांना औपचारिक शिक्षण मिळणे अपेक्षित आहे. त्याचा आधार घेऊन पाषाण शाळांमधील मुले जिल्हा परिषदेच्या शाळेत दाखल करण्याचे आदेश शासनाने दिले होते. पाषाण शाळा बंद करण्यासाठी अधिकारी पाषाण शाळेत गेले असताना पाषाणशाळांचे कार्यकर्ते आणि शिक्षण विभागातील अधिकारी यांच्यात वाद झाला.

तो पोलिसांच्या मध्यस्थीने सोडवण्यात आला. त्या वादानंतर पाषाणशाळेच्या विरोधात वाघमारे आणि नोटीस देण्यात आलेल्या इतर शिक्षकांनी गुन्हा दाखल करावा, अशी सूचना शिक्षण विभागाकडून देण्यात आली. मात्र वाघमारेंसह कारवाई झालेल्या इतर शिक्षकांनी पोलिसांकडे तक्रार करण्यास किंवा साक्षीदार होण्यास नकार दिला. त्यामुळे वाघमारे यांच्यासह केंद्र प्रमुख, आणि इतर पाच शिक्षकांना शिस्तभंग केल्याची नोटीस पाठवण्यात आली होती.

  • जीवन वाघमारे यांच्या आत्महत्येच्या निषेधार्थ हवेलीतील शाळा बुधवारी बंद ठेवण्यात आल्या होत्या.