कॉलसेंटर चालकाने केलेल्या कामाचा मोबदला न देता २७ लाख ६० हजारांची फसवणूक केल्याप्रकरणी एका कंपनीच्या संचालकांविरुद्ध स्वारगेट पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
याप्रकरणी हेअर रिग्रोथ सिरम लि.चे संचालक नवीन शंकर आणि विपनन अधिकारी तेजस यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमितेश आयटी सव्र्हिसेसचे संचालक अमितेश देशमुख (वय ३५, रा. राजयोग सोसायटी, धनकवडी ) यांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे. स्वारगेट येथील वेगा सेंटर या व्यापारी संकुलात देशमुख यांचे कॉलसेंटर आहे. गेल्यावर्षी नवीन शंकर आणि तेजस यांनी कंपनीच्या उत्पादनांची जाहिरात आणि विक्रीचे काम देशमुख यांना दिले. त्यासाठी देशमुख यांनी ७० ते ७५ कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली.
देशमुख यांनी या कामापोटी कर्मचाऱ्यांना दररोज सहाशे ते साडेसहाशे रुपये मोबदला दिला. या कामापोटी देशमुख यांना आरोपींकडून २७ लाख ६० हजार रुपये देणे होते. कामाचा मोबदला मिळवण्यासाठी देशमुख यांनी पाठपुरावा केला. मात्र, आरोपींनी त्यांना पैसे दिले नाही. त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक प्रदीप पलांडे तपास करत आहेत.