ठेवीदाराची २ कोटी ९० लाखांची फसवणूक

भाईचंद हिराचंद रायसोनी पतसंस्थेविरुद्ध (बीएचआरएस) ठेवीदाराची २ कोटी ९० लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी पतसंस्थेचे अध्यक्ष प्रमोद रायसोनी यांच्यासह दहा संचालकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठेवीदार अनिल किसनलाला मर्दा (वय ५४) यांनी यासंदर्भात डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी महाराष्ट्र ठेवीदार गुंतवणूक हितसंबंध कायद्याअंतर्गत प्रमोद रायसोनी, मधुकर सानप, दिलीप चोरडिया यांच्यासह दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भाईचंद हिराचंद रायसोनी पतसंस्थेच्या घोले रस्ता शाखेत अनिल मर्दा व त्याच्या वडिलांनी २ कोटी ९० लाख रुपयांच्या ठेवी ठेवल्या होत्या. त्यांनी या पतसंस्थेतून १ कोटी ९० लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. मर्दा यांनी कर्जाची रक्कम जवळपास फेडली होती. त्यांनी मुदतठेव रक्कम परत करण्याची मागणी पतसंस्थेकडे केली होती. मात्र, पतसंस्थेकडून ती परत करण्यात आली नव्हती.

दरम्यान, पतसंस्थेतील आर्थिक गैरव्यवहारांमुळे पतसंस्थेची आर्थिक परिस्थिती डबघाईला आली होती. त्यामुळे पतसंस्थेच्या व्यवहारांवर र्निबध घालण्यात आले. अनेक ठेवीदारांचे पैसे बुडाले. त्यामुळे पुण्यातील डेक्कन, शिवाजीनगर, चतु:शंृगी, सिंहगड पोलीस ठाण्यात रायसोनी आणि संचालकांविरुद्ध गुन्हे दाखल झाले आहेत.

सिमेंटच्या कारखान्यात सहा लाखांची वीजचोरी

कारखान्याच्या मालकावर भारतीय विद्युत कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल

चऱ्होली बुद्रुक (ता. हवेली) येथील दीपाली स्टोन क्रशर या सिमेंटचे ब्लॉक बनविणाऱ्या कारखान्यामध्ये ४३ हजार ९७४ युनिटची म्हणजे सहा लाख एक हजार ४१० रुपयांची वीजचोरी महावितरण कंपनीने उघडकीस आणली आहे. या प्रकरणी कारखान्याचे मालक सचिन तानाजी खांदवे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

महावितरण कंपनीकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, महावितरणच्या भोसरी विभागांतर्गत चऱ्होली बुद्रुकमध्ये निगुर्डी-लोहगाव रस्त्यावर दीपाली स्टोन क्रशर या कारखान्याला महावितरणने औद्योगिक वीजजोडणी दिलेली आहे. या कारखान्यातील वीजवापराबाबत संशय निर्माण झाल्याने महावितरणकडून वीजमीटरच्या यंत्रणेची तपासणी करण्यात आली. त्यात या कारखान्याच्या जवळच असलेल्या फिडर पिलरला थेट केबल जोडून वीजचोरी होत असल्याचे आढळून आले. त्यानुसार ही वीजचोरी पकडण्यात आली.

वीजचोरी उघडकीस आणण्यासाठी मुख्य अभियंता रामराव मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली अधीक्षक अभियंता महेंद्र दिवाकर, कार्यकारी अभियंता सुनील िशदे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता अनिल वरपे, सहायक अभियंता रमेश सूळ, तंत्रज्ञ अजित मस्के, विजयकुमार गलांडे, बाळासाहेब तापकीर, सतीश राख, रवीकिरण मुंडे, किरण िशदे, राहुल पाठक व चालक प्रमोद डगवार आदींनी योगदान दिले.

कारखान्याचे मालक खांदवे यांच्या विरुद्ध बुधवारी रास्ता पेठ  येथील महावितरण पोलीस ठाण्यात भारतीय विद्युत कायदा २००३ नुसार कलम १३५ अन्वये गुन्हा दाखल झाला आहे.

तरुणाला लुबाडणाऱ्याला अटक

कोथरूड भागात महाविद्यालयीन तरुणाला धमकावून त्याच्याकडील १३ हजारांची रोकड लुटून पसार झालेल्या चोरटय़ांना पोलिसांनी पकडले.

अजय षण्मुगम चेटियार (वय २४) आणि अमर तुकाराम गायकवाड (वय २८, दोघे रा. केळेवाडी, पौड फाटा, कोथरूड) अशी अटक करण्यात आलेल्या चोरटय़ांची नावे आहेत. काशिनाथ हनुमंत मल्लपल्ली (वय १९, रा. हॅपी कॉलनी, कोथरूड) याने यासंदर्भात फिर्याद दिली होती. शनिवारी (२३ जुलै) काशिनाथ दुपारी करिश्मा सोसायटीनजीक असलेल्या कॅनॉल रस्त्याने निघाला होता. त्या वेळी सराईत चोरटे चेटियार व गायकवाडने त्याला अडवले. काशिनाथला धमकावून त्याच्याकडील १३ हजार रुपये लुटून पसार झाले होते. चेटियार व गायकवाड या दोघांनी लूटमार केल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर दोघांना सापळा रचून पकडले. पोलीस निरीक्षक बी. जी. मिसाळ, गुन्हे शाखेचे निरीक्षक विजयकुमार शिंदे, सहायक निरीक्षक संदीप बुवा, उपनिरीक्षक पंकज शिनगारे, हवालदार दीपक खरात, अभय देशपांडे, नितीन कांबळे, राजेंद्र लांडगे, योगेश बडगे, किरण नेवसे, सुतार, प्रकाश विटेकर, तानाजी शेगर, रोमेश ढावरे, जावेद शेख, पूनम मदगे यांनी ही कारवाई .

औषधाच्या आमिषाने महिलेची फसवणूक

आयुर्वेदिक औषध देण्याच्या आमिषाने एका महिलेकडून ८२ हजार रुपये उकळणाऱ्या भामटय़ांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला. कोथरुड परिसरात ही घटना घडली.

याप्रकरणी शिंदे आणि नीलकंठेश्वर आयुर्वेद या दुकानाच्या मालकाविरुद्ध  शिल्पा जयंत गरूड (वय ५५, रा.पौड रस्ता, कोथरुड) यांनी यासंदर्भात कोथरुड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिल्पा गरूड या गेल्या काही दिवसांपासून आजारी आहेत. ७ जुलै रोजी त्या कोथरुड परिसरातून निघाल्या होत्या. त्यावेळी एका भामटय़ाने त्यांना अडविले आणि आयुर्वेदिक औषध देण्याचे आमिष दाखवले. भामटय़ाने दाखवलेल्या आमिषाला त्या बळी पडल्या. भामटय़ाने त्याचे नाव शिंदे असे सांगितले होते. त्यानंतर शिंदे त्यांच्या घरी गेला. त्याने एका डब्यात औषधसदृश द्रव ओतले. गरूड यांना औषधांमध्ये आणखी काही आयुर्वेदिक औषधे मिसळावी लागतील असे सागून त्यांच्याकडून १९ हजार ९०० रुपये उकळले.

त्यानंतर गरूड यांना घेऊन तो जंगलीमहाराज रस्त्यावरील नीलकंठेश्वर आयुर्वेद दुकानात आला. त्याने तेथून काही औषधे घेतली. त्या औषधांचे ६२ हजार रुपये द्यावे लागतील, असे त्याने सांगितले. गरूड यांनी ही रक्कम त्याला धनादेशाद्वारे दिली. दरम्यान, भामटय़ाकडून घेतलेल्या औषधांचा काही उपयोग होत नसल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली.