पुणे, पिंपरीतील ३९ पोलीस ठाण्यांना मिळून अवघे सहाच ‘लॉकअप’
वाढत्या नागरीकरणामुळे पुणे आणि पिंपरीतील गुन्हेगारीच्या घटना वाढत असताना आरोपींचा शोध घेण्यासोबतच पुणे पोलिसांना आता या आरोपींना डांबून ठेवण्यासाठी कोठडय़ांचाही शोध घ्यावा लागत आहे. पुण्यातील ३९ पोलीस ठाण्यांत मिळून अवघे सहाच ‘लॉकअप’ असून ते सदैव गुन्हेगारांनी भरलेले असल्याने नवीन आरोपींना कुठे ठेवायचे, अशी विवंचना पोलिसांना सतावत आहे.
पुणे शहरातील गुन्हेगारी घटनांमध्ये गेल्या काही वर्षांत वाढ होत आहे. साहजिकच दररोज पकडल्या जाणाऱ्या आरोपींच्या संख्येतही वाढ होत आहे. त्यामुळे आरोपीला अटक केल्यानंतर त्याला घेऊन शहरातील कु ठले लॉकअप मोकळे आहे, याचा शोध आता पोलिसांना घ्यावा लागतो. आरोपीला पकडण्यापेक्षा त्याला सुरक्षित ठेवणे हे जिकिरीचे काम झाले आहे.
पुणे शहरात सर्वात मोठे लॉकअप मध्यभागातील विश्रामबाग-फरासखाना पोलीस ठाण्याच्या तळमजल्यावर आहे. त्या बरोबरच लष्कर, बंडगार्डन, खडकी, भोसरी, पिंपरी आणि येरवडा या पोलीस ठाण्यांच्या आवारात आरोपींना ठेवण्यासाठी स्वतंत्र लॉकअप आहेत. विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या आवारातील लॉकअपमध्ये महिला व पुरुष आरोपींना ठेवण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था आहे. या लॉकअपमध्ये महिला आणि पुरुष मिळून एकाचवेळी १०० आरोपींना ठेवण्याची व्यवस्था आहे. मात्र, शहरातील सर्वाधिक मोठे लॉकअप म्हणून ओळखले जाणारे हे लॉकअप कायमच आरोपींनी भरलेले असते. किरकोळ आणि गंभीर गुन्ह्यातील आरोपींना तेथे ठेवले जाते. दररोज पकडल्या जाणाऱ्या आरोपींची संख्या पाहता शहरात आणखी लॉकअप तयार करण्याची गरज आहे, असे एका पोलीस अधिकाऱ्याने ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.
उपनगरांमध्ये गुन्हेगारी टोळ्यांमधील वर्चस्वाच्या वादातून सातत्याने वाहनांची तोडफोड करणे, वाहने पेटविणे, नागरिकांच्या घरांवर दगडफे क करणे अशा घटना घडत आहेत. किरकोळ वादातून हाणामाऱ्यांचेही प्रमाण वाढत असून खून, दरोडा, घरफोडीसारख्या गंभीर गुन्ह्य़ांमध्येही वाढ झाली आहे. दखलपात्र गुन्ह्य़ांत आरोपीला अटक केल्यानंतर पोलीस त्याला पोलीस कोठडीत ठेवतात. मोक्का (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा) अंतर्गत कारवाई करण्यात आलेल्या आरोपींना लॉकअपमध्ये ठेवण्यात येते. सर्वाधिक मोठे लॉकअप म्हणून ओळखले जाणाऱ्या विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या आवारात असलेल्या लॉकअपमध्ये पुणे शहरातील दहा ते बारा पोलीस ठाण्यांच्या हद्दीत पकडल्या जाणाऱ्या आरोपींना ठेवले जाते. तसेच गुन्हे शाखेकडून (क्राईम बँ्रच) पकडण्यात आलेल्या आरोपींनाही तेथे ठेवले जाते. त्यामुळे आरोपीला पकडण्यापेक्षा त्याला ठेवण्यासाठीची व्यवस्था हीच पोलिसांपुढील मुख्य समस्या झाली आहे.

पुणे शहरात दररोज पकडल्या जाणाऱ्या आरोपींच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे बऱ्याचदा पकडलेल्या आरोपींना लॉकअपमध्ये ठेवण्यासाठी जागा उपलब्ध नसते. कोथरूड पोलीस ठाण्याच्या आवारात असलेल्या लॉकअपच्या दुरूस्तीचे काम लवकरच पूर्ण होईल. तसेच येत्या १५ ऑगस्टपर्यंत वाकड पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असलेले लॉकअप सुरू होईल. डेक्कन पोलीस ठाण्याच्या आवारातील लॉकअपची देखील दुरुस्ती करण्यात येईल. त्यामुळे लॉकअपवर पडणारा भार थोडय़ाफार प्रमाणात कमी होईल. आरोपींना ठेवण्यासाठी लवकरच आणखी तीन लॉकअप उपलब्ध होतील. तसेच आगामी काळात नवीन पोलीस ठाण्यांमध्ये लॉकअप बांधण्यास प्राधान्य दिले जाणार आहे.
सुधीर हिरेमठ, पोलीस उपायुक्त

पोलीस ठाणी ३९, लॉकअप सहा
पुणे शहरात ३९ पोलीस ठाणी आहेत. त्यापैकी चार ते पाच पोलीस ठाण्यांची निर्मिती नव्याने झाली आहे. प्रत्येक पोलीस ठाण्याच्या आवारात आरोपींना ठेवण्यासाठी स्वतंत्र लॉकअपची सुविधा असणे आवश्यक आहे. मात्र, सध्या शहरात सहाच लॉकअप आहेत. त्यात दोनशेपर्यंत आरोपींना ठेवता येते. दररोज पकडल्या जाणाऱ्या आरोपींना ठेवण्यासाठी लॉकअप अपुरे पडत आहेत. बऱ्याचदा लॉकअप भरलेली असतात. काही पोलीस ठाण्यांच्या आवारात लॉकअप आहेत, मात्र तेथे स्वच्छतागृहं नाहीत. त्यामुळे लॉकअप असूनही ती बंद आहेत. कोथरूड पोलीस ठाण्यातील लॉकअप स्वच्छतागृह खराब झाल्यामुळे बंद आहे. लॉकअपमधील दुरुस्तीची कामे सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करण्यात येतात. मात्र, तक्रार करूनही लॉकअपच्या डागडुजीच्या कामांकडे दुर्लक्ष करण्यात येते. त्यामुळे पोलिसांनाच ही कामे करावी लागतात, अशीही माहिती काही पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.
राहुल खळदकर