लष्कर भागातील सेंटर स्ट्रीटवरील सराफी बाजार हा ब्रिटिशकालीन बाजार आहे. शहराच्या पूर्व भागात असलेल्या या सराफी बाजारात विदेशी ग्राहकसुद्धा आवर्जून खरेदीसाठी येत असतात. या भागातील उत्कर्ष जेम्स अँड ज्वेलर्स या सराफी पेढीत खरेदीच्या बहाण्याने शिरलेल्या दोन विदेशी चोरटय़ांनी साडेचार लाख रुपयांच्या हिरेजडित बांगडय़ा लांबवल्या. या चोरीनंतर घटनास्थळी असलेल्या सीसीटीव्ही चित्रीकरणाच्या आधारे पोलिसांनी चोरटय़ांचा माग काढण्यास सुरुवात केली. एकतर विदेशातील चोरटे असल्याने त्यांचा माग कसा काढायचा, हादेखील प्रश्न पोलिसांपुढे होता. मात्र, पोलिसांनी तपासकौशल्याचा वापर करून अखेर सराफी दुकानात चोऱ्या करणाऱ्या विदेशी चोरटय़ांना गोव्यात जाऊन पकडले. या चोरटय़ांनी उत्तर प्रदेश आणि हरयाणातील सराफी दुकानांत चोऱ्या केल्याचे उघड झाले आहे.

सेंटर स्ट्रीट भागातील उत्कर्ष जेम्स अँड ज्वेलर्समध्ये गेल्या सोमवारी (२० मार्च) सकाळी साडेअकराच्या सुमारास दोन विदेशी व्यक्ती खरेदीच्या बहाण्याने शिरल्या. त्यांनी सराफी दुकानातील कर्मचाऱ्याला सोन्याचे दागिने दाखवण्यास सांगितले. विदेशी ग्राहकांच्या सूचनेनुसार पेढीतील कर्मचाऱ्याने त्यांना दागिने दाखवण्यास सुरुवात केली. कर्मचाऱ्याचे लक्ष नसल्याची संधी साधून त्या वेळी त्यांनी शोकेसमधील दोन हिरेजडित सोन्याच्या बांगडय़ा लांबवल्या. त्यानंतर दागिने पसंत नसल्याचे सांगून दोघे जण बाहेर पडले. सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास उत्कर्ष श्रॉफ (वय ३५) यांनी शोकेसची पाहणी केली तेव्हा बांगडय़ा जागेवर नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी केलेले चित्रीकरण पडताळून पाहिले. तेव्हा सकाळी साडेअकराच्या सुमारास दुकानात शिरलेल्या दोन विदेशी व्यक्तींनी शोकेस उघडून बांगडय़ा चोरल्याचे दिसत होते. श्रॉफ यांनी तातडीने या घटनेची माहिती लष्कर पोलिसांना दिली. परिमंडल दोनचे पोलीस उपायुक्त पंकज डहाणे, सहायक आयुक्त नीलेश मोरे यांनी विदेशी चोरटय़ांना पकडण्याच्या सूचना पोलिसांना दिल्या.

Orenthal James Simpson
स्पोर्ट्समन, सेलेब्रिटी… मग पत्नीची हत्या, निर्दोष मुक्तता तरी कफल्लक आयुष्य… ओ. जे. सिम्प्सन यांचे आजही अमेरिकेवर गारूड कसे?
bombay high court nitesh rane speech examine
मीरा-भाईंदर हिंसाचार प्रकरण : नितेश राणेंसह दोन भाजपा नेत्यांची भाषणं तपासण्याचे कोर्टाचे आदेश
Girish Bapat photograph
धंगेकरांच्या प्रचारासाठी गिरीश बापट यांच्या छायाचित्राचा वापर? छायाचित्र वापरण्यास बापट यांच्या चिरंजीवांचा आक्षेप
Sidhu Moosewala father is Balkaur Singh
पंजाब सरकारने छळ केल्याचा मूसेवाला यांच्या वडिलांचा आरोप; मुलाचा जन्म कायदेशीर असल्याचे सिद्ध करण्यासाठी दबाव

विदेशी चोरटय़ांचा गोव्यापर्यंत माग काढला गेला. या तपासाची माहिती तपासपथकातील सहायक पोलीस निरीक्षक विठ्ठल साळुंके यांनी सांगितली. गुन्हा घडल्यानंतर सराफ व्यावसायिक श्रॉफ यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. पोलिसांनी श्रॉफ यांच्या दुकानातील सीसीटीव्ही फुटेज पडताळले.

तेव्हा चोरटय़ांनी केलेला पेहराव आणि त्यांचे वर्णन पाहता ते विदेशी असल्याचे निष्पन्न झाले. विदेशी चोरटे असल्याने त्यांचा माग कसा काढायचा, हा प्रश्न पोलिसांपुढे होता. त्यामुळे ज्या दिवशी गुन्हा घडला. त्या दिवशी लष्कर परिसरातील महात्मा गांधी रस्ता, ईस्ट स्ट्रीट, बंडगार्डन रस्ता भागातील सीसीटीव्ही फुटेज पडताळण्यास पोलिसांनी सुरुवात केली. तेव्हा श्रॉफ यांच्या दुकानातून बाहेर पडलेले दोघे जण गडबडीत निघाल्याचे आढळून आले. काही अंतरावर असलेल्या मोटारीतून ते पसार झाल्याचे दिसले. पोलिसांनी कॅमेऱ्यांनी टिपलेल्या मोटारीच्या क्रमांकाची पडताळणी केली. क्रमांक धूसर दिसत होता. वाहनाच्या पाटीवरून मोटारची नोंदणी गोव्यात झाल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी तातडीने गोव्यातील प्रादेशिक परिवहन कार्यालय आणि पोलिसांशी संपर्क साधला, अशी माहिती साळुंके यांनी दिली.

विदेशी व्यक्तींनी भाडेतत्त्वावर मोटारी देणाऱ्या ट्रॅव्हल कंपन्यांशी संपर्क साधला, तेव्हा एका मोटारीतून सॅन्डीडे गिवी मामलूक (वय ५३) आणि सिमोनी कॉर्क्‍सइडीज (वय ३५, दोघे रा. जॉर्जिया) हे २० मार्च रोजी पुण्यात आल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी तातडीने मोटारीच्या चालकाशी संपर्क साधला. दरम्यान, वरिष्ठ पोलीस निरीक्षक वसंत कुवर, गुन्हे शाखेच्या निरीक्षक वैशाली चांदगुडे यांच्या सूचनेनुसार उपनिरीक्षक विशाल चव्हाण, पोलीस शिपाई निरंजन जाधव, युवराज कांबळे यांचे पथक गोव्यात पोहोचले. त्यांनी गोवा पोलिसांना घटनेची माहिती दिली आणि तपासात सहकार्य करण्याची विनंती केली. त्यानुसार पोलिसांनी विदेशी चोरटय़ांना पकडण्यासाठी एक योजना आखली. पोलिसांनी मोटारीच्या चालकाशी संपर्क साधला आणि पुण्यात तुमच्या मोटारीने एकाला धडक दिली. त्यामुळे चौकशीसाठी तातडीने गोवा पोलिसांशी संपर्क साधावा, अशी बतावणी केली. त्यानुसार मोटारचालक सॅन्डीडे आणि सिमोनी यांना घेऊन गोव्यातील पोलीस ठाण्यात हजर झाला. पोलिसांनी चौकशीचा बहाणा करून दोघांना ताब्यात घेतले. चौकशीत दोघांनी लष्कर भागातील सराफी दुकानात चोरी केल्याची कबुली दिली, असे साळुंके यांनी सांगितले.

सॅन्डीडे आणि सिमोनी यांच्याकडे पारपत्राची मागणी करण्यात आली, तेव्हा कर्नाटकातील मेंगलोर पोलिसांनी चोरीच्या गुन्हय़ात अटक केल्यानंतर पारपत्र जप्त केले, असे या दोघांनी सांगितले. दहा वर्षांपासून ते गोव्यात वास्तव्याला होते, अशीही माहिती त्यांनी दिली आहे. मेंगलोर येथील चोरीच्या प्रकरणात दाखल असलेल्या खटल्याची सुनावणी सध्या सुरू आहे.

काही वर्षांपूर्वी गुरगाव आणि उत्तर प्रदेशातील सराफी दुकानात चोऱ्या केल्याची कबुली त्यांनी दिली. सॅन्डीडे आणि सिमोनी गोव्यात रशियन पर्यटकांना योग प्रशिक्षण द्यायचे. योग प्रशिक्षणाच्या नावाखाली त्यांनी तांबेमिश्रित सोन्याचे दागिने खरे असल्याचे भासवून ते रशियन पर्यटकांना विकण्याचा उद्योग केला होता. त्यात त्यांनी अनेकांची फसवणूक केली. मात्र, फसवणूक झालेले रशियात गेल्यानंतर त्यापैकी कोणी तक्रार देण्यास पुढे आले नाही. सुरुवातीला दोघांनी तपासात असहकार्य केले. पोलिसांनी गोव्यातील रशियन दुभाषीच्या मदतीने त्यांच्याशी संवाद साधून त्यांना बोलते केले. दोघे जण धूर्त आहेत. ते हिंदीदेखील बोलू शकतात.