आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तो तरुण प्रभात रोड पोलीस चौकीत गेला. त्याला डेक्कन पोलीस ठाण्यात पाठविण्यात आले. त्याने तिथे तक्रार अर्ज दिला. तो ठाणे अंमलदाराने घेतला आणि न बघताच ठेवून दिला. ‘पुढे काय?’ अशी विचारणा केल्यावर तुम्हाला ‘फोन करतो’ असे सांगितले. गंमत म्हणजे त्या अर्जावर फोन नंबर नव्हता. तेही ठाणे अंमलदाराने पाहिले नव्हते. कारण काय सांगितले, तर ‘निवडणूक डय़ुटी आहे.’ पुढे चोवीस तासानंतरही तो अर्ज तसाच पडून होता. साधा गुन्हा नोंदविण्यात आला नव्हता. तातडीने तपास करण्याची गोष्ट तर दूरदूरवरची!
पुण्याचे पोलीस आयुक्त सतीश माथूर जाहीरपणे असे सांगतात की, आलेली तक्रार तातडीने नोंदवून घेण्याचे आदेश दिलेले आहेत. प्रत्यक्षात मात्र नागरिकांना उलटाच अनुभव येत असल्याचे सोमवारी घडलेल्या या प्रकाराने दाखवून दिले. विनायक आत्माराम कुलकर्णी (रा. हिंगणे, कर्वेनगर) यांना हा अनुभव आला.
कुलकर्णी खासगी कंपनीत नोकरी करतात. एका खासगी बँकेचे प्रतिनिधी असल्याचे सांगून तिघांनी त्यांची फसवणूक केली. त्यांना घर बांधण्यासाठी बँकेचे कर्ज मिळवून देत असल्याचे सांगून त्यांच्याकडून प्रोसेसिंग फी म्हणून त्यांच्याकडून २४ हजार ९०० रुपयांचा धनादेश घेतला. तो बँकेत जमा न करता खासगी खात्यावर जमा केला. हा धनादेश सोमवारी (२९ सप्टेंबर) खासगी खात्यात जमा झाला, हे लक्षात येताच कुलकर्णी यांनी बँकेत धाव घेतली. हे तिघेही बँकेचे कर्मचारी नसल्याचे समजले. मग कुलकर्णी यांनी त्यांच्या बँकेकडून धनादेशाची रक्कम कोणत्या खात्यात जमा झाली ही माहिती घेतली. मात्र, त्याच्या तपशिलासाठी पोलीस तक्रार आवश्यक असल्याचे सांगण्यात आले. त्यानुसार कुलकर्णी सोमवारी दुपारी प्रभात पोलीस चौकीत गेले. तेथून त्यांना डेक्कन पोलीस ठाण्यात पाठविण्यात आले. तेथे ते दुपारी तीनच्या सुमारास गेले. त्यांनी कागदावर तक्रारअर्ज लिहून दिला. तातडीने तपास झाला तर बँक माहिती देईल व आरोपी सापडतील, अशी त्यांची अपेक्षा होती. मात्र, ठाणे अंमलदारांनी अर्ज न पाहता तसाच ठेवून घेतला. त्यावर कुलकर्णी यांनी विचारणा केली तेव्हा, ‘निवडणुकीची डय़ूटी आहे, त्यामुळे तक्रार दाखल करून घ्यायला वेळ लागेल. आम्ही तुम्हाला फोन करू,’ असे सांगितले. प्रत्यक्षात त्या अर्जावर फोननंबर आहे का, हेही ठाणे अंमलदारांनी पाहिले नव्हते. कुलकर्णी मोबाईल क्रमांक देऊन निघून गेले.
ते दुसऱ्या दिवशी, मंगळवारी पुन्हा डेक्कन पोलीस ठाण्यात गेले. तरीसुद्धा त्यांच्या तक्रारीची दखल घेतलेली नव्हती. तो अर्ज तसाच पडून होता. याबाबत कुलकर्णी यांनी सांगितले की, ज्या खात्यावर पैसे जमा झाले आहेत, त्या खातेदाराचे नाव आणि आपण ज्या व्यक्तिशी बोललो त्याचे नाव एकच आहे. त्यामुळे पोलिसांनी माहिती घेतली तर आरोपी सापडू शकतील, पण तपास करणे लांबच, पोलिसांनी साधी तक्रारही दाखल करून घेतली नाही.
अशी झाली फसवणूक
कुलकर्णी यांना प्रवीण पाटील असे नाव सांगणाऱ्या व्यक्तीचा मोबाईल आला. त्याने एका मोठय़ा खासगी बँकेचा प्रतिनिधी असल्याचे सांगून कर्ज हवे आहे का, अशी विचारणा केली. कुलकर्णी यांना कर्ज हवे असल्याने त्यांनी होकार दिला. पाटील त्यांना भेटला आणि रवींद्र बावणे व अमित भागवत अशी नावे सांगणाऱ्या दोन कथित वरिष्ठांशी बोलणे करून दिले. पाटील याने कुलकर्णी यांच्याकडून आवश्यक ती सर्व कागदपत्रे ताब्यात घेतली. आपले कर्जाचे प्रकरण होणार असल्याचे सांगून प्रोसेसिंग फी म्हणून २४,९०० रुपयांचा धनादेश देण्यास सांगितला. तो ‘अकाउंट पेयी’ असल्याने कुलकर्णी यांनीही गेल्या शनिवारी (२७ सप्टेंबर) धनादेश दिला. सर्व कागदपत्रांची तपासणी झाल्यानंतर कर्ज मंजूर होताना ही प्रोसेसिंग फी बँकेत जमा होईल, असे त्यांना सांगण्यात आले. मात्र, दोनच दिवसांनी धनादेश वटल्याचे कुलकर्णी यांना समजले. त्यामुळे त्यांना संशय आला. त्यांनी पाटील याच्याशी संपर्क साधला. त्याने काहीतरी कारण सांगितले. त्यानंतर त्याचा व त्याच्या कथित वरिष्ठांचा फोन लागला नाही. मग कुलकर्णी थेट बँकेत गेले. तेव्हा त्यांना बँकेत या नावाचे कर्मचारीच नसल्याचे समजले.