स्वत:च्या पाच वर्षे वयाच्या मुलाचा खून केल्यानंतर स्वत: इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केलेल्या संगणक अभियंता महिलेच्या पतीवरही खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिंहगड रस्त्यावरील माणिकबाग परिसरात रविवारी ही घटना घडली होती. प्रथमदर्शनी या गुन्ह्य़ामध्ये महिलेच्या पतीचा सहभाग आढळत नसला, तरी त्याबाबत ठोस काही पुरावा मिळेपर्यंत सर्व शक्यता गृहीत धरून हा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिसांच्या वतीने सांगण्यात आले.
तेजस अंकुश मोरे (रा. निखिल गार्डन सोसायटी, माणिकबाग, सिंहगड रस्ता) यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. त्यांची पत्नी दीप्ती तेजस मोरे (वय ३४) हिने घटनेनंतर आत्महत्या केली होती. या दोघांवरही त्यांचा मुलगा अर्णव (वय ५) याचा खून केल्याचा गुन्हा सिंहगड पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस हवालदार विकास मते यांनी फिर्याद दिली आहे.
तेजस मोरे यांनी रविवारी घटनेबाबत पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, त्यांची पत्नी दीप्ती हिने अर्णवचा दुसऱ्या खोलीमध्ये हाताच्या नसा कापून व गळा दाबून खून केला. ‘माझ्याकडून आयुष्यातील अपेक्षा पूर्ण होत नसल्याने मी तेजसला मारले आहे व मलाही राहायचे नाही’, असे सांगून तिने बाहेरून दाराला कुलूप लावले व इमारतीच्या गच्चीवरून उडी मारून आत्महत्या केली. तेजस यांनी घराची चावी खिडकीतून खाली फेकली व त्यानंतर शेजाऱ्यांनी कुलूप उघडले. या सर्व घडामोडीमध्ये प्राथमिक तपासानंतर पोलिसांनी तेजस यांना या प्रकरणात फिर्यादी न करता विविध शक्यता गृहीत धरून आरोपी केले आहे. या प्रकरणी दिलेल्या फिर्यादीनुसार, दोघांनी मुलाचा गळा दाबून व हाताच्या नसा कापून खून केल्याचे म्हटले आहे.
पोलीस उपायुक्त सुधाकर पाठारे याबाबत म्हणाले, खुनाची घटना घडली त्या वेळी घरात पती-पत्नीच होते. तपासामध्ये कोणतीही शक्यता दुर्लक्षित करून चालणार नाही. प्रथमदर्शनी तेजस मोरे यांचा या गुन्ह्य़ात सहभाग वाटत नसला, तरी त्यांचा सहभाग नाकारणारे काही ठोस मिळत नाही, तोवर सर्व शक्यता गृहीत धरूनच हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पुढील तपास सुरू आहे.