पिंपरीतील मोरवाडी चौकात उघडपणे होणारी वाहतूक पोलिसांची ‘खाबुगिरी’ एका तरुणाने धाडसाने मोबाईलमध्ये चित्रित केली. मात्र, त्याचे हे धाडस त्याच्या अंगाशी आले. वाहनस्वारांना अडवून पावती न देता सुरू असलेली आपली ‘हप्तेगिरी’ चित्रित झाल्याचे समजल्याने संतापलेल्या त्या दोन पोलिसांनी त्याला चांगलाच चोप दिला. माझ्याकडून हे गैरकृत्य झाल्याचे नमूद करून त्यांनी त्या तरुणाकडून सक्तीने माफीनामा लिहून घेतला.
वाहनस्वारांना अडवून वाहतूक पोलीस पावत्या न देता त्यांच्याकडून पैसे उकळत असल्याचा प्रकार मोरवाडी चौकात सर्रास होतात. त्यामुळे एका पंचवीस वयाच्या तरुणाने ‘स्टींग ऑपरेशन’ करण्याचे ठरवले. त्यानुसार, शनिवारी दोन वाहतूक पोलिसांच्या सर्व करामती त्याने चित्रित केल्या. मात्र, पोलिसांना त्याचा सुगावा लागला. बऱ्याच वेळापासून सुरू असलेली ‘हप्तेगिरी’ चित्रित झाल्याचे पाहून ते संतापले. त्यांनी त्या तरुणाचा मोबाईल काढून घेतला, त्याला पकडून खराळवाडीतील कामगार भवन येथील कार्यालयात आणले. तेथे त्याला अश्लील शिव्या देत मारहाण करण्यात आली. मोबाईलमध्ये त्याने काढलेले फोटो व चित्रीकरण नष्ट करण्यात आले. त्याला आरोपीप्रमाणे बसवून त्याचे फोटो काढण्यात आले. तुला आतच घालतो, असा दम भरला. माझ्याकडून हे गैरकृत्य झाले, असे यापुढे होणार नाही, असे लिहून घेतले. पुन्हा असा काही प्रकार केला तर घरी पोलीस पाठवून बेडय़ा घालून आणू, असा दम भरून त्याला सोडण्यात आले. मात्र, जाताना पुन्हा मारहाण करण्यात आली. या संदर्भात, संबंधित तरुणाने वाहतूक विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना हा प्रकार कळवला. मात्र, त्यांनी ‘हाताची घडी, तोंडावर बोट’, अशी सोयीस्कर भूमिका घेतल्याचे समजते.