पिंपरी-चिंचवडमधील निगडी येथे सोशल मीडियाद्वारे नागरिकांची फसवणूक केली जात असल्याचा बातम्या सातत्याने उजेडात येत आहेत. आता तर एका नामांकित कंपनीच्या मॅनेजरला फेसबुकच्या माध्यमातून तब्बल २१ लाख रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार पुढे आला आहे. फसवणूक झालेल्या पल्लब दीपक दत्ता यांनी या संदर्भात निगडी पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पल्लब दीपक दत्ता (वय ३७, रा.सुदर्शन नगर श्रीकृष्ण सोसायटी चिखली) यांना फेसबुकवर एक विदेशी महिला बेरी हिची फ्रेंड रिक्वेस्ट आली आणि पल्लब यांनी ती अॅक्सेप्ट केली. त्यानंतर या दोघांत फेसबुकद्वारे बोलणं सुरु झालं आणि त्यांच्यात चांगलीच मैत्री जमली. तसेच पल्लब यांचा विश्वास संपादन करून त्यांना बेरीने तिच्या जाळ्यात ओढलं. सहा सप्टेंबर २०१६ रोजी बेरी हिने पल्लब यांना तिच्या मोबाईलवरून फोन करून मी व्यापार करण्यासाठी पुण्यात येणार असून, मला पैशाची गरज आहे, असे सांगितले. तुम्ही पैसे द्या मी तुला गिफ्ट पाठवत आहे, असेही ती म्हणाली.

त्यानंतर सीमाशुल्क विभागाच्या एका बनावट अधिकाऱ्याचा पल्लब यांना फोन आला आणि त्यांने तुमचे गिफ्ट आले असून, ते घेण्यासाठी ४० हजार रुपये खात्यावर भरण्यास पल्लब यांना सांगितले. पल्लब यांनी त्या खात्यावर पैसे भरले. अशाप्रकारे आठ ते दहा वेळेस वेगवेगळ्या खात्यावर त्यांनी पैसे भरले. महत्त्वाचे म्हणजे एवढे झाल्यावरही बेरी हिने पल्लब यांच्याकडे ११ लाख रुपयांची मागणी केली. बेरी हिने पल्लब यांना एकूण २१ लाख ३८ हजार रुपयांना गंडा घातला. हा सर्व प्रकार एक वर्ष चालला होता. या प्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक एस. व्ही. औताडे यांनी दिली.