नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण, शहराला गुन्हेगारीचा विळखा

मावळत्या वर्षांत पिंपरी-चिंचवड शहरात गुन्हेगारी घटनांमध्ये कमालीची वाढ झाली असून सर्वाधिक घटना तोडफोडीच्या झाल्या आहेत. एके काळी शांतताप्रिय शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उद्योगनगरीला गुन्हेगारीचा विळखा पडल्याचे चित्र पुढे आले आहे. दोन गटातील हाणामारी, पूर्ववैमनस्य, दहशत निर्माण करण्यासाठी, दारू पिऊन धिंगाणा अशा विविध कारणास्तव झालेल्या तोडफोडीच्या घटनांनी शहरात भीतीचे वातावरण आहे. पोलीस यंत्रणा असून नसल्यासारखी आहे. अशाप्रकारच्या घटनांवर नियंत्रण आणण्यात पोलिसांना अद्याप तरी यश आलेले नाही.

एकीकडे वेगवान विकासामुळे पिंपरी-चिंचवडचा नावलौकिक राज्यभरात झाला आहे. ‘बेस्ट सिटी’ आणि ‘क्लीन सिटी’ म्हणून शहराला पुरस्कार दिले जात आहेत. दुसरीकडे, शहरातील गुन्हेगारी चिंताजनक पातळीवर पोहोचली आहे.

अन्य गुन्हे प्रकाराबरोबरच पिंपरी-चिंचवडमध्ये कधी नव्हे त्या तोडफोडीच्या घटनांचे सत्र सुरू झाले असून काही केल्या ते थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. थेरगाव, काळेवाडी, प्राधिकरण, आकुर्डी, चिखली, पिंपरी, सांगवी, संत तुकारामनगर, नेहरूनगर, लांडेवाडी, भोसरी, दिघी, चिंचवड स्टेशन अशा शहराच्या विविध भागात आतापर्यंत तोडफोडीच्या घटना घडल्या आहेत.

साधारणपणे एका महिन्याच्या अंतराने या तोडफोडीच्या घटना असतात. त्यामागची कारणे वेगवेगळी असल्याचे पोलीस तपासात पुढे आले आहे. दोन गटातील हाणामारी होते, त्याचा राग वाहनांवर काढला जातो.

कधी पूर्ववैमनस्य असते म्हणून गाडय़ा फोडल्या जातात. एखाद्या ‘एरिया’त आपल्या नावाची दहशत निर्माण करण्यासाठी म्हणून उगवत्या ‘भाई’ मंडळींकडून हा ‘उद्योग’ केला जातो. तर, कधी दारू पिऊन धिंगाणा म्हणून वाहनांची तोडफोड केली जाते. काही दिवसांपूर्वी पिंपरीतील महेशनगर, नेहरूनगर व भोसरी एमआयडीसी परिसरात एकाच दिवशी सुमारे १५ वाहनांची तोडफोड करण्यात आली. आलिशान मोटारी, पीएमपी बस, खासगी प्रवासी बस अशा वाहनांचा त्यात समावेश होता. रस्त्यावर लावण्यात आलेल्या मोटारी अशा वेळी लक्ष्य ठरल्या आहेत.

पोलिसांकडून वेळोवेळी कारवाई होत असली, तरी तोडफोडीच्या घटना कमी न होता वाढताना दिसत आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

मतपेटीसाठी गुन्हेगारांना राजाश्रय

शहरातील गुन्हेगारीला राजाश्रय मिळतो, हे उघड गुपित आहे. गल्लीबोळात ‘भाईगिरी’ करणाऱ्यांना राजकीय पाठबळ मिळते म्हणून ते उन्मत्त होतात, ही वस्तुस्थिती आहे. एकीकडे गुन्हेगारी वाढल्याचा टाहो फोडणारी मंडळींच गुन्हेगारांचा वापर करण्यात आघाडीवर असतात. आता महापालिका निवडणुका तोंडावर आहेत. प्रत्येक पक्षाला झोपडपट्टी ‘दादा’ तसेच ‘एरिया’तील ‘भाईं’ची गरज असते. मतांच्या राजकारणासाठी नेतेमंडळींची ‘कृपादृष्टी’ लाभणार असल्याने पुन्हा एकदा गुन्हेगारांना मोकळे रान मिळाल्यास आश्चर्य वाटू नये.

पिंपरीतील गुन्हेगारी वाढली

पुणे :पिंपरी-चिंचवडपरिसरातील गुन्हेगारीत वाढ होत असून विशिष्ट भागात दहशत उत्पन्न करण्यासाठी दगडफेक करणे, गाडय़ा फोडणे, दुचाक्या जाळणे अशांसारखे प्रकार शहरात सातत्याने घडत आहेत. अनेक छोटय़ा-मोठय़ा घटनांमध्ये वाहनांचे नुकसान करण्याचे अनेक प्रकार शहरात गेल्या वर्षभरात सातत्याने घडले.

ऑक्टोबर २०१५ पासून डिसेंबर २०१६ पर्यंतच्या मोठय़ा गुन्ह्य़ांचा संक्षिप्त तपशील

* ९ ऑक्टोबर २०१५- भोसरी भागात सोन्या काळभोर टोळीकडून ४० ते ५० वाहनांची तोडफोड; दुकानांवर दगडफेक

* २३ ऑक्टोबर २०१५- पिंपरीत टोळक्याची दहशत, मॉलवर दगडफेक

* २३ ऑक्टोबर २०१५- काळेवाडी भागात पूर्ववैमनस्यातून पाच जणांना टोळक्याकडून बेदम मारहाण

* २७ ऑक्टोबर २०१५- चिंचवड-शाहूनगर भागात २० ते २५ वाहनांची तोडफोड

* १० एप्रिल २०१६- देहूरोड भागात मुलीची छेड काढण्यावरून टोळक्याकडून दगडफेक, वाहने आणि दुकानांचे नुकसान

* ३० एप्रिल २०१६- आकुर्डी-प्राधिकरणात वीस ते पंचवीस मोटारींच्या काचा फोडल्या

* १० जून २०१६- थेरगावमध्ये वर्चस्वाचा वाद, दोन गटात मारामारी, मोटारींच्या काचा फोडल्या

* ११ जून २०१६- खडकी बाजार परिसरात दोन गटात वाद, शस्त्रे उगारून दहशत, वाहनांची तोडफोड

* २२ जून २०१६- थेरगाव भागात टोळक्याकडून तरुणाला मारहाण, वाहनांची मोडतोड

* १३ ऑगस्ट २०१६- सांगवीतील शितोळेनगर भागात तरुणाला मारहाण, वाहनांच्या काचा फोडल्या

* १९ डिसेंबर २०१६- दुचाकीस्वार गुंडांची २२ वाहनांवर दगडफे क

* २५ डिसेंबर २०१६- पिंपरतील मोरवाडी भागात पादत्राणांचे पैसे मागितल्याने दुकान पेटवले, सोळा लाखांचे नुकसान