पोलिसांनी फ्लेक्स हटवला; अज्ञाताविरुद्ध गुन्हा

गेल्या काही दिवसांपासून वाहतूक पोलिसांकडून नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध कारवाई करण्यास सुरुवात झाली आहे. मार्चअखेरीमुळे या कारवाईचा वेग वाढवण्यात आला आहे. पोलिसांच्या कारवाईला त्रासलेल्या काही जणांकडून टिळक रस्त्यावरील स.प. महाविद्यालय चौकात पोलिसांवर टीका करण्यात आलेला फलक लावण्यात आला आहे. हा फलक पोलिसांच्या दृष्टीस पडल्यानंतर तातडीने हटवण्यात आला असून, फलक लावणाऱ्याविरुद्ध विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वाहतुकीचे नियम धुडकावणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध कारवाई करण्यासाठी पोलिसांकडून वेळोवेळी मोहीम राबवण्यात येते. मार्च महिन्यात आर्थिक वर्षांची सांगता होते. त्यामुळे पोलिसांनी बेशिस्त वाहनचालकांविरुद्ध कारवाई करण्याचा वेग वाढवला आहे. शहरातील सर्व प्रमुख चौकांत नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करण्यात येत आहे. काही ठिकाणी वाहनचालकांकडून पोलिसांशी हुज्जत घालण्याचे प्रकार घडले आहेत. टिळक रस्त्यावरील गजबजलेल्या स.प. महाविद्यालय चौकात मंगळवारी मध्यरात्री काही जणांनी वाहतूक पोलिसांवर टीका करणारा फलक लावला. ‘टार्गेट पूर्ण करण्यासाठी वाहनचालकांचा बळी, त्रासातून पुणेकरांची कोणी सुटका करेल का?’ अशी टीका त्यात करण्यात आली आहे. मंगळवारी सकाळी नागरिकांनी हा फलक पाहिला. त्यानंतर टिळक रस्ता भागात या फलकावरून चर्चा सुरू झाली. स. प. महाविद्यालय वाहतूक नियमन करणाऱ्या पोलिसांच्या दृष्टीस हा फलक पडला. त्यांनी तातडीने हा फलक हटवला आणि विश्रामबाग पोलीस ठाण्यात आणला. त्यानंतर रात्री या प्रक रणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फलक लावणाऱ्या अज्ञातांविरुद्ध महाराष्ट्र मालमत्ता विद्रुपण प्रतिबंधक अधिनियम १९९५चे कलम तीननुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, भर चौकात पोलिसांवर टीका करणारा फलक लावणाऱ्याचा पोलिसांकडून शोध घेण्यात येत आहे. स. प. महाविद्यालय चौकातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याने केलेले चित्रीकरण पोलिसांकडून पडताळण्यात येत आहे. पोलीस हवालदार एस. बी. वाकसे तपास करत आहेत.