पुणे स्टेशन परिसारातील सोहराब हॉल या इमारतीतील क्राॅसवर्ड या पुस्तकाच्या दुकानाला रविवारी रात्री लागलेल्या भीषण आगीमध्ये लाखो रुपयांची पुस्तके भस्मसात झाली. अग्निशामक दलाच्या जवानांनी नऊ तासांच्या प्रयत्नानंतर ही आग आटोक्यात आणली. इमारतीमध्ये अडकलेल्या चौघांची जवानांनी सुटका केली. या दरम्यान दोन जवानांना इजा झाली. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी शॉर्टसर्कीटमुळे ही आग लागली असावी, अशी शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
ताडीवाला रस्त्यालगत असलेल्या सोहराब हॉल या इमारतीमधील क्रॉसवर्ड या दुकानातून मोठय़ा प्रमाणावर धूर निघत असल्याची माहिती रविवारी रात्री आठ वाजून चाळीस मिनिटांच्या सुमारास अग्निशामक दलाला मिळाली. एकीकडे गणेश विसर्जनाची धूम सुरू असताना व अग्निशामक दलाचे जवान विसर्जन मिरवणुकीत कर्तव्यावर असताना ही माहिती आली. सुरुवातीला दोन बंब घटनास्थळी रवाना करण्यात आले. अग्निशामक दलाचे प्रमुख प्रशात रणपिसे, विभागीय अधिकारी दत्तात्रय नागलकतर, रमेश गांगड, समीर शेख, शिवाजी चव्हाण, गजानन पाथ्रुडकर यांनी घटनास्थळी धाव घेतली.
अग्निशामक दलाचे बंब घटनास्थळी दाखल होण्यापूर्वी दुकानातील हजारो पुस्तकांनी त्या वेळी पेट घेतला होता. त्यामुळे मोठय़ा प्रमाणावर धूर निघत होता. त्यामुळे दुकानाच्या काचा फोडून धूर बाहेर काढण्याचा प्रयत्न करण्यात आला व त्याबरोबरीने पाण्याचा माराही करण्यात आला. आगीची स्थिती भीषण असल्याचे लक्षात आल्यानंतर ११ बंब व चाळीस जवान घटनास्थळी पोहोचले. इमारतीतील सुरक्षा रक्षक व एका बँकेतील तीन कर्मचारी इमारतीत अडकल्याची माहिती जवानांना मिळाली. चौघेही धुरामुळे गुदमरण्याची शक्यता होती. त्यामुळे त्यांना इमारतीच्या टेरेसवर जाण्याच्या सूचना करण्यात आल्या व हायड्रॉलिक प्लॅटफॉर्मचा वापर करून चौघांना इमारतीच्या खाली आणण्यात आले. पहाटे पाचच्या सुमारास आग आटोक्यात आली. अग्निशामक दलाचे जवान राजाराम केदारी यांच्या नाका तोंडात धूर गेल्याने व जितेंद्र सपाटे यांना काच लागल्याने त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. आगीचे निश्चित कारण समजले नाही, मात्र शॉर्टसर्कीटमुळे आग लागली असावी, अशी शक्यता रणपिसे यांनी व्यक्त केली.