‘अमर आग’चा शतकपूर्ती प्रयोग

आर्यानी केलेल्या वेदनिर्मितीपासून तो चक्रवर्ती सम्राटांची परंपरा.. परकीयांची आक्रमणे.. शिवरायांच्या शौर्याचा धगधगता इतिहास.. १८७५ चे स्वातंत्र्यसमर असा भारतमातेला पारतंत्र्याच्या जोखडातून मुक्त करणारा स्वातंत्र्यलढय़ाचा इतिहास शनिवारवाडय़ाच्या खुल्या रंगमंचावरून नृत्य-नाटय़ाद्वारे रविवारी उलगडला.

भारतीय कला वैभव संस्थेतर्फे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून ‘अमर आग’ या कार्यक्रमाचा शतकपूर्ती प्रयोग सादर झाला. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, मंगळयान मोहिमेतील शास्त्रज्ञ नितीन घाटपांडे, ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त, कार्यक्रमाचे निर्मितीप्रमुख मंदार परळीकर या वेळी उपस्थित होते. कार्यक्रमात एकूण ४० गायक, वादक व नृत्य कलाकारांचा समावेश होता. अमित काकडे, सचिन जांभेकर, नितीन िशदे, राजू जावळकर, दीप्ती कुलकर्णी, निखिल महामुनी, उद्धव कुंभार, अभिजित पंचभाई, अजित विसपुते, अनुराधा पटवर्धन, अमिता घुगरी, मीनल पोंक्षे, अमृता गोगटे यांच्यासह या कार्यक्रमात ४० गायक, वादक आणि नृत्यकलाकारांचा सहभाग होता.

‘ओंकार अनादि अनंत’, ‘ओम नमो नारायणाय’, ‘हम करे राष्ट्र आराधन, ‘जयदेव जयदेव जय जय शिवराया’, ‘म्यानातून उसळे तलवारीची पात’, ‘मराठी पाऊल पडते पुढे’ अशा सुरेल गीतांनी महाराष्ट्राचा इतिहास उलगडला. त्याचबरोबर वादनाची सुरेख साथ आणि अप्रतिम नृत्यविष्कारातून कार्यक्रमात विशेष रंग भरला. ‘आई अंबे जगदंबे हा गोंधळ’, ‘चतन्याची थाप’ यांसारख्या आवेशपूर्ण पोवाडय़ातून स्वातंत्र्यलढय़ाच्या समरभूमीतील ‘अमर राग’ प्रेक्षकांसमोर सादर झाला.

देवगिरीचे साम्राज्य, शिवकाल, १८५७ चे स्वातंत्र्यसमर, पानिपत हा संपूर्ण इतिहास प्रभावीपणे सादर झाला. मंदार परळीकर यांनी निवेदन केले.

पुरंदरे म्हणाले,की देशाला पुन्हा वैभवसंपन्न करण्यासाठी आपण शिवचरित्राप्रमाणे वाटचाल करायला हवी.  महाराणा प्रताप, चाणक्य या महापुरुषांनी असामान्य पराक्रम देशाच्या वेगवेगळ्या प्रत्येक प्रांतात गाजविला आहे. या महापुरुषांचे स्मरण संपूर्ण देशाने करायला हवे.