दिवाळीनिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी लाखो रुपयांचा खर्च

दिवाळीनिमित्त पिंपरी -चिंचवड शहरात सांस्कृतिक कार्यक्रमांचा धडाकाच सुरू असल्याचे चित्र पुढे आले आहे. त्यामुळे एकप्रकारे उद्योगनगरी सध्या ‘सांस्कृतिकनगरी’ झाली आहे. निवडणुकीपूर्वी मोक्याच्या क्षणी दिवाळीचा सण आल्यामुळे निवडणूक इच्छुकांनी मोठय़ा संख्येने कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. या इच्छुकांच्या सांस्कृतिक कार्यक्रमांची भर पडल्यामुळेच कार्यक्रमांची संख्या चांगलीच वाढली आहे. एरवी अशा कार्यक्रमांच्या आयोजनासाठी नकारघंटा वाजवणारेच त्यासाठी लाखो रुपयांचा खर्च बेधडकपणे करताना दिसत आहेत. यानिमित्ताने शहरवासीयांना चांगल्या कार्यक्रमांची मेजवानी मिळते आहे.

आगामी महापालिका निवडणुका चार महिन्यांनंतर होण्याची शक्यता आहे. ‘दिवाळी सण मोठा, नाही आनंदाला तोटा’, असे मानली जाणारी दिवाळी यंदा निवडणुकांच्या तोंडावर आल्याने या सणाचा पुरेपूर उपयोग करून घेण्याचा चंग राजकीय मंडळींनी बांधला आहे. दिवाळीनिमित्त प्रभागातील नागरिकांना विविध भेटवस्तू, मिठाई देण्याचा सपाटा जिकडेतिकडे सुरू आहे. आपापल्या भागातील नागरिकांचे मनोरंजन करण्यासाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन जागोजागी होत असल्याने शहरभरात सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल दिसून येत आहे. दरवर्षी मर्यादित स्वरूपात ‘दिवाळी पहाट’ कार्यक्रमांचे आयोजन होत होते. या वेळी मात्र त्या कार्यक्रमांची संख्या वाढली आहे.

शहरातील एकही असा भाग शिल्लक नसेल जिथे निवडणुका डोळय़ांसमोर ठेवून अशा कार्यक्रमांचे आयोजन झालेले नाही. नाटय़गृहांमध्ये अशा कार्यक्रमांसाठी खास आरक्षण दिले गेले आहे. िपपळे गुरव आणि प्राधिकरण येथील पालिकेच्या उद्यानांमध्येच ‘दिवाळी पहाट’चे कार्यक्रम होत आहेत. निवडणुकीच्या दृष्टिकोनातून अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहोचणे, त्यांना आकृष्ट करणे हाच मुख्य हेतू अशा कार्यक्रमांच्या आयोजनामागे आहे. यासाठी लाखो रुपयांचा खर्च करण्यात येत आहे. त्यात कोणत्याही प्रकारची कसूर केली जात नाही. त्यामुळे तात्पुरत्या स्वरूपात सांस्कृतिकनगरी बनलेल्या या शहरातील नागरिक भरगच्च कार्यक्रमांची मेजवानी मिळताना दिसत आहे.