निगडीतील भक्ती-शक्ती शिल्पसमूह चौकात शुक्रवारी पहाटे दोन ट्रकचा समोरसमोर अपघात झाला. रुग्णालयात वापरण्यात येणारे हायड्रोजनचे सिलिंडर एका ट्रकमध्ये होते. अपघातानंतर स्फोटासारखे आवाज होऊन ट्रकला आगही लागली. त्यामुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली. महामार्गावरील वाहतूक काही काळासाठी ठप्प झाली. पोलीस व अग्निशामक दलाच्या जवानांनी वेळीच हालचाली केल्याने पुढील अनर्थ टळला.

पुण्याहून मुंबईला निघालेला मालवाहतुकीचा ट्रक आणि मुंबईहून पुण्याला हायड्रोजन सिलिंडर नेणारा ट्रक यांच्यात शुक्रवारी पहाटे साडेचारच्या सुमारास अपघात झाला. अपघातानंतर सिलिंडर असणारा ट्रक निगडी ते दापोडी ग्रेडसेपरेटर मार्गावरच आडवा पडला. त्यामुळे ट्रकमध्ये असलेले सिलिंडर रस्त्यावर येऊ लागले. त्यातील तीन सिलिंडरचा स्फोट झाला व आग लागली. पाहता-पाहता ती आग वाढली. त्यामुळे या मार्गावरून जाणाऱ्या वाहनस्वारांमध्ये घबराट पसरली. दरम्यानच्या काळात पोलीस व पालिकेच्या अग्निशामक दलाची यंत्रणा तेथे दाखल झाली. त्यांनी केलेल्या संयुक्त प्रयत्नामुळे वेळेतच आग आटोक्यात आली. खबरदारीचा उपाय म्हणून पुढील दीड तास मुख्य रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला व वाहतूक सेवा रस्त्यावर वळवण्यात आली. दरम्यान, या अपघातात ट्रकचे वाहक व चालक जखमी झाले.