डॉ.नरेंद्र दाभोलकर यांची हत्येप्रकरणी अटक केलेल्या मनीष नागोरी आणि विकास खंडेलवाल या दोन्ही आरोपींना जामीन मंजूर करण्यात आला आहे.  दोन्ही आरोपींच्या विरोधात ठोस पुरावे नसल्यामुळे जामीन मंजूर करण्यात आला.
मनीष रामविलास नागोरी ऊर्फ मन्या ऊर्फ राजूभाई (वय २४) आणि विकास रामअवतार खंडेलवाल (वय २४, दोघेही रा. इचलकरंजी, जि. कोल्हापूर) या दोघांना डॉ. दाभोलकर हत्याप्रकरणामध्ये २० जानेवारी रोजी अटक करण्यात आली होती. त्यानंतर या दोघांना न्यायालयीन कोठडी सुनाविण्यात आली होती.
मुंब्रा पोलिसांनी विकास खंडेलवाल याच्याकडून पिस्तूल जप्त केले होते. ७.६५ एएम कॅलिबरचे हे पिस्तूल आणि नरेंद्र दाभोलकर यांची हत्या करण्यासाठी वापरलेले पिस्तूल एकच असल्याचे बॅलेस्टिक अहवालामध्ये स्पष्ट झाले आहे. खंडेलवाल याला हे पिस्तूल मनीष नागोरी यानेच दिले असल्याचे निष्पन्न झाले असून तशी कबुलीही नागोरी याने दिली आहे, असे पोलिसांनी न्यायालयात सांगितले. परंतु, दाभोलकर यांच्या खुनासंबंधी कोणतेही ठोस पुरावे नसल्याने बचाव पक्षाच्या वकिलांनी दोघांना जामीन मंजूर करण्यात यावा असा युक्तीवाद मांडला आणि न्यायालयाने दोघांनाही जामीन मंजूर केला आहे.