डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या मारेकऱयांचा शोध घेण्यासाठी ‘प्लँचेट’चा आधार घेतल्याप्रकरणी पत्रकार आशिष खेतान यांनी स्टिंग ऑपरेशन केलेला व्हिडिओ ‘एबीपी’ या वृत्तसंस्थेमार्फत सार्वजनिक केला आहे. त्यामुळे याप्रकरणाचा तपास करणारे पुण्याचे माजी पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ गोत्यात येण्याची शक्यता आहे. डॉ. दाभोलकरांच्या मारेकऱयांना शोधण्यासाठी ‘प्लँचेट’ करण्यात आल्याचा आऊटलूक मासिकामधील आशिष खेतान यांच्या दाव्यावर शंभर कोटींचा अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार असल्याचे गुलाबराव पोळ यांनी मागील आठवड्यात पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट केले होते.
पत्रकार खेतान यांनी स्टिंग ऑपरेशनचे दोन व्हिडिओ मंगळवारी सार्वजनिक केले. यातील एका व्हिडिओमध्ये एक व्यक्ती दाभोलकरांच्या आत्म्याने तिच्या शरीरात प्रवेश केल्याचे सांगत डॉ. दाभोलकरांच्या हत्येप्रकरणी तपासाबाबत वृत्तपत्रात आलेल्या बातम्यांचीच माहिती देताना दिसते. तर, दुसऱया व्हिडिओमध्ये खुद्द गुलाबराव पोळ यांनी मुलाखतीत मनीष ठाकूरच्या मदतीने ‘प्लँचेट’ करून दाभोलकरांच्या आत्म्याशी संपर्क साधल्याचे कबुल केल्याचे दिसत आहे. एवढेच नव्हे तर ‘सनातन प्रभात’ या हिंदुत्त्ववादी संघटनेवरही त्यांनी संशय व्यक्त केला आहे. परंतू पुराव्याअभावी त्यांच्यावर कारवाई करता येत नसल्याचेही त्यांनी या व्हि़डिओमध्ये म्हटले आहे.
अंधश्रध्दा निर्मुलनासाठी आयुष्यभर झटणा-या डॉ. दाभोलकरांच्या मृत्युनंतरही त्यांच्या मारेक-यांचा शोध घेण्यासाठी पोलीसांमार्फत ‘प्लँचेट’चा आधार घेतल्याने समाजातील विविध स्तरातून प्रचंड रोष व्यक्त होत आहे. दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार सदर प्रकरणाचे पुरावे आढळल्यास योग्य ती कारवाई करू, असे प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटले आहे. त्यामुळे या स्टिंग ऑपरेशनमुळे या प्रकरणाला नवे वळण मिळण्याची शक्यता आहे.