पालकमंत्र्यांच्या अट्टाहासामुळे पाणीकपात वाढणार
दौंडला पिण्यासाठी अर्धा टीएमसी (अब्ज घनफूट) पाणी खडकवासला धरणातून सोडण्याची तयारी पालिकेतील गटनेत्यांनी दाखविली असतानाही या सर्वाना झुगारून लावत पालकमंत्री गिरीश बापट यांनी दौंडसह इंदापूरला एक टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. इंदापूरला कालव्यातून पाणी सोडूनही ते पोहोचणार नसल्याचे जिल्हा प्रशासनाचे म्हणणे असतानाही इंदापूरला पाणी सोडण्याचा खटाटोप केला जात आहे. पालकमंत्र्यांच्या या अट्टाहासामुळे आठ महिन्यांपासून कपात करून वाचविलेल्या पाण्यावर गदा येणार असून, पुणेकरांना आणखी पाणी कपातीला सामोरे जावे लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
दौंड व इंदापूरसाठी अर्धा ते पाऊण टीएमसी पाणी सोडण्याबाबतचे नियोजन कालवा समितीच्या बैठकीत करण्यात आले होते. त्याला पुणेकरांनी कडाडून विरोध केला होता. दौंडला पिण्यासाठीच पाणी हवे असेल, तर कालव्याऐवजी टँकर किंवा रेल्वेने पाणी पुरविण्याचा विचार करावा, अशी मागणीही करण्यात आली होती. पुण्यात आणखी पाण्याची कपात न करता दौंडला पाणी सोडण्यात येईल, असे बापट यांनी जाहीर केले होते. मात्र, प्रत्यक्ष निर्णय घेताना बापट यांनी कालवा समितीत ठरलेले नियोजनही बदलले व दौंडसह इंदापूरलाही नियोजनापेक्षा जास्त पाणी सोडण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय घेताना होणारा विरोध लक्षात घेता पालिकेला पूर्णपणे अंधारात ठेवण्यात आले होते. केवळ दौंड व इंदापूरला आमदारांच्या उपस्थितीत पाणी सोडण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले.
खडकवासला धडणातून पिण्यासाठी केवळ दौंडला पाणी सोडण्यात यावे. सोडलेले पाणी इंदापूपर्यंत पोहोचणार नाही. इंदापूरला उजनी धरणातून पाणी घेणे शक्य आहे, असे म्हणणे जिल्हा प्रशासनाने मांडले होते. मात्र, त्यालाही बापट यांनी गुंडाळून ठेवत निर्णय घेतला. पुण्याला आणखी पाणी कपात होणार नसल्याचा दावाही त्यांनी पुन्हा केला असला, तरी जुलैमध्ये पाऊस लांबल्यास पाणी येणार कुठून, याचे कोणतेही नियोजन किंवा चर्चा झाली नाही. मंगळवारी दुपारपासूनच टप्प्याटप्प्याने मुठा उजव्या कालव्यातून पाणी सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. दौंडला सुमारे ०.४५ टीएमसी, तर उर्वरित पाणी इंदापूरला सोडण्यात येणार आहे.

दौंडला पिण्यासाठी सोडलेले पाणी शेतीत मुरले?
दौंडला फेब्रुवारीमध्ये १५ मे पर्यंत पुरेल इतके पाणी पिण्यासाठी सोडण्यात आले होते. जून २०१५ ते फेब्रुवारी २०१६ पर्यंत चार वेळा मिळून ५.५० टीएमसी पाणी दौंडसाठी सोडण्यात आले. दौंडच्या साठवण तलावाची क्षमता ०.०४५ टीएमसी आहे. त्यामुळे चार वेळा मिळून एकूण ०.२ टीएमसी पाणी साठवण तलावात गेले. गळती वगळता इतर पाणी केले कुठे, हा प्रश्न अनुत्तरित आहे. कालव्यातून पाणी सोडल्यानंतर कृषी पंप बंद केले जातात, पिण्याचे पाणी उपसण्यावर बंदी घातली जाते, असे सांगितले जात आहे. मात्र खरी स्थिती या भागातील मंडळींशी केलेल्या चर्चेतून स्पष्ट होते. कालव्यातून पाणी सोडल्यानंतर दौंडच्या तलावापासून अर्धा ते एक किलोमीटरच्या टप्प्यात शेतीसाठी मोठय़ा प्रमाणावर पाणी उपसले जाते. यापूर्वीही पिण्यासाठी सोडलेले पाणी मोठय़ा प्रमाणावर शेतीसाठी उचलले गेल्याने पाणी मुदतीपूर्वी संपले व या गोष्टीला राजकीय पाठिंबा असल्याचा आरोप करण्यात येत आहे.
.. म्हणून वाढणार पाणीकपात
पुणेकरांना मागील आठ महिन्यांपासून एकदिवसाआड पाणी मिळत आहे. ही पाणीकपात सहन केल्यानंतर खडकवासला धरणामध्ये सध्या सुमारे साडेपाच टीएमसी पाण्याचा साठा आहे. सध्याची पाणीकपात गृहीत धरून १५ जुलैपर्यंत पुण्यासाठी ३.०५ टीएमसी पाणी लागणार आहे. कडक उन्हाळा पाहता धरणातील पाऊण ते एक टीएमसी पाण्याचे बाष्पीभवन होण्याची शक्यता आहे. आणखी महत्त्वाची बाब म्हणजे जूनच्या अखेरीस पालख्या निघणार आहेत. त्यामुळे वारकऱ्यांसाठी अर्धा टीएमसी पाणी कालव्यात सोडावे लागते. त्यातच दौंड व इंदापूरला एक टीएमसी पाणी सोडल्यास शिल्लक काय राहणार, याचे गणित उघड आहे. जुलैमध्ये पाऊस लांबला, तर कुणालाही पाणी मिळणार नाही, अशीच शक्यता आहे. त्यामुळे पुण्यात पाणीकपात वाढणार असल्याचे स्पष्ट आहे.
पालिकेला विश्वासात न घेता खडकवासला धरणातून दौंड व इंदापूरसाठी पाणी सोडण्याबाबत पालकमंत्र्यांनी घेतलेला निर्णय धक्कादायक आहे. गरजेपेक्षा जास्त पाणी ग्रामीण भागात सोडण्यात आल्याने आगामी काळात पुणेकरांसमोरील अडचणी आणखी वाढण्याची भीती आहे. पालकमंत्र्यांनी पुणेकरांना अडचणीत आणले असून, आपण कोणाला निवडून दिले, याचा विचार नागरिकही करतील.
– प्रशांत जगताप, महापौर