परीक्षा प्रमाद समितीपुढे ज्यांच्यावरील आरोपांची सुनावणी सुरू आहे, अशा अधिष्ठात्यांचीच नियुक्ती व्यवस्थापन परिषदेने परीक्षा नियंत्रकपदाच्या नेमणूक प्रक्रियेत छाननी समितीवर केली आहे. त्यामुळे संशयीताच्या हातीच खजिन्याच्या चाव्या देणार का, अशी चर्चा सध्या विद्यापीठात सुरू आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील रिक्त असलेल्या परीक्षा नियंत्रकपदासाठी सध्या नेमणुकीची प्रक्रिया सुरू आहे. नेमणूक प्रक्रियेत छाननी समितीवर व्यवस्थापन परिषदेतील दोन सदस्यांची नेमणूक करण्यात येते. परिषदेच्या बुधवारी झालेल्या बैठकीत दोन सदस्यांची नियुक्ती छाननी समितीवर करण्यात आली आहे. या समितीवर निवडण्यात आलेले एक सदस्य विद्यापीठातील एका मोठय़ा विद्याशाखेचे अधिष्ठाता आहेत. या अधिष्ठात्यांची सध्या परीक्षा प्रमाद समितीसमोर सुनावणी सुरू आहे.
 या अधिष्ठात्यांबद्दल विद्यापीठाकडे सातत्याने तक्रारी येत होत्या. विद्यापीठाने माहिती अधिकारात दिलेल्या माहितीमधूनही अधिष्ठात्यांच्या कारभाराचे अनेक नमुने समोर आले होते. मुले अभियांत्रिकी शाखेचे शिक्षण घेत असल्याची माहिती या अधिष्ठात्यांनी विद्यापीठाला दिली नसल्याची तक्रार विद्यापीठाकडे करण्यात आली होती. विद्यापीठाने हे प्रकरण परीक्षा प्रमाद समितीकडे सोपवले होते. या प्रकरणात माहिती अधिकारात विद्यापीठाकडूनच मिळालेल्या कागदपत्रांच्या आणि माहितीच्या आधारे तक्रार केली असल्याचा तक्रारदाराचा दावा आहे. जुलैच्या शेवटच्या आठवडय़ात या प्रकरणाची सुनावणी झाली होती. मात्र, गेल्या वर्षभरापासून चर्चेत असलेल्या या प्रकरणाचा अहवाल सादर करण्यास विद्यापीठाकडून दिरंगाई करण्यात येत आहे. अहवाल सादर झाला नसल्यामुळे अद्याप हे अधिष्ठाता दोषी किंवा निर्दोष सिद्ध झालेले नाहीत. असे असतानाही विद्यापीठाने त्यांना परीक्षा नियंत्रकपदाच्याच निवड प्रक्रियेत सहभागी करून घेतले आहे. असा प्रकार घडला असल्याच्या वृत्ताला विद्यापीठातील उच्च पदस्थांनीही दुजोरा दिला आहे. मात्र, हा व्यवस्थापन परिषदेचाच निर्णय असल्यामुळे याबाबत परीक्षा प्रमाद समितीचा अहवाल आल्यानंतरच निर्णय घेता येऊ शकतो, असे सूत्रांनी सांगितले.
परीक्षा नियंत्रकपदासाठी विद्यापीठाकडे २४ अर्ज आले आहेत. आलेल्या अर्जाची छाननी करून त्यामधून मुलाखतीसाठी उमेदवार निवडण्याचे काम छाननी समितीचे असते. मात्र, परीक्षेतील गैरप्रकारांसाठीच चर्चेत असलेल्या आणि परीक्षा प्रमाद समितीपुढे सुनावणी सुरू असलेल्या सदस्यालाच परीक्षा नियंत्रकपदाच्या निवड प्रक्रियेत सहभागी करून घेतल्यामुळे ‘संशयीताच्या हाती खजिन्याच्या चाव्या..’ अशी चर्चा विद्यापीठात सुरू आहे.