पाऊस कमी पडल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून केवळ चर्चेत असलेली पाणीकपात अखेर पुण्यामध्ये लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, येत्या सोमवारपासून शहरात ३० टक्के पाणी कपात करण्यात येणार आहे. त्यामुळे शहरात दिवसाआड पाणी पुरवठा होणार आहे. पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कालवा समितीच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला.
जुलै आणि ऑगस्ट या दोन्ही महिन्यांमध्ये पुण्यात अत्यल्प पाऊस पडला आहे. त्यामुळे शहराला पाणीपुरवठा करणाऱया खडकवासला प्रकल्पातील पानशेत, वरसगाव, टेमघर आणि खडकवासला या चारही धरणांमध्ये गेल्यावर्षीच्या तुलनेत अत्यंत कमी पाणीसाठा आहे. गेल्यावर्षी या काळात २६ टीएमसी पाणीसाठा चारही धरणांमध्ये शिल्लक होता. सध्या चारही धरणांमध्ये मिळून केवळ १४ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. त्या पार्श्वभूमीवर पाणीकपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शहराच्या सर्वभागांमध्ये दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येणार असून, पुणे महापालिका त्याचे नियोजन करणार आहे.
पुढील काळात मोठा पाऊस पडण्याची शक्यता नसल्यामुळे पाणीकपात न केल्यास उन्हाळ्यामध्ये भीषण परिस्थितीला तोंड द्यावे लागेल, असे जिल्हाधिकाऱयांनी यापूर्वीच स्पष्ट केले होते. त्यामुळे महापालिकेकडूनही पाणीपुरवठ्याचे फेरनियोजन करण्यात येते आहे. पाण्याच्या वापरावरही अनेक बंधने घालण्यात आली आहेत.