एखाद्या नकारात्मक गोष्टीलाही आपल्या बाजूने वळवून सकारात्मक प्रतिसाद मिळवणे ही बाजारपेठेची खुबी आणि म्हटले तर ताकदही. पाळीव प्राण्यांच्या बाजारपेठेत नकारात्क प्रतिसादाकडून सुरू झालेला आणि आता प्रतिष्ठेचे लक्षण या टप्प्यापर्यंत पोहोचलेला काळ्या मांजराचा प्रवास हे याचेच उदाहरण म्हणता येईल. भारतासह जगातील बहुतेक देशांमध्ये गैरसमजाचीच धनी ठरलेल्या काळ्या मांजरीसाठी गेल्या काही वर्षांमध्ये मागणी वाढली आहे. गेल्याच आठवडय़ात झालेला ‘ब्लॅक कॅट अ‍ॅप्रिसिएशन डे’, ‘ऑक्टोबरमध्ये पाळला जाणारा ब्लॅक कॅट अवेअरनेस डे’ अशा प्रयत्नांतून गैरसमजांबाबत जागृती झालीच पण त्या पलिकडे जाऊन या मांजरीभोवती एक बाजारपेठ उभी राहिली. मार्जार सौंदर्याच्या प्रचलित व्याख्येच्या पलिकडे जाऊन ‘स्फिंक्स’ प्रजातीच्या मांजरीसाठी वाढलेली मागणी हे देखील बाजारपेठीय क्लृप्त्यांचे यश मानता येईल.

बदलाची पावले

loksatta analysis report on status of leopards in india
विश्लेषण : बिबटे वाढलेत… शेतात, गावच्या वेशीवर आणि सिमेंटच्या जंगलातही!
Is eating poha better than idli for breakfast
Poha Or Idli : नाश्त्यात पोह्यापेक्षा इडली खाणे चांगले? मधुमेहाच्या रुग्णांसाठी कोणता नाश्ता चांगला? वाचा, तज्ज्ञ काय सांगतात….
Quick Heal Technologies, a cybersecurity software company, kailash sanjay katkar
वर्धापनदिन विशेष: संगणकीय डॅाक्टर… ‘क्विक हिल’चे काटकर बंधू
NMMT Bus Service Stopped in Uran
उरणमधील एनएमएमटी बससेवा बंद

साधारपणे घरी पाळण्यासाठी मांजरी आणताना पिल्लांचा रंग हा सर्वात महत्त्वाचा घटक असतो. पांढरट-पिवळा, पांढरट-काळा, राखाडी-पिवळा, चॉकलेटी-पांढरा याच रंगांच्या मिश्र प्रजातींच्या मांजरी सगळीकडे पाळलेल्या पाहायला मिळतात. भारतात शौकीन मार्जारप्रेमी परदेशी मांजरांची आयात करू लागल्यानंतर गेल्या काही वर्षांमध्ये वेगळ्या रंगांच्या आणि ढंगांच्या मांजरी घरांमध्ये दिसू लागल्या आहेत. त्याचबरोबर गेल्या काही वर्षांत भारतातही एक महत्त्वाचा बदल घडू लागला आहे, तो म्हणजे आपल्याकडे आतापर्यंत सहसा पाळण्याचे टाळल्या जाणाऱ्या संपूर्ण काळ्या जातीच्या मांजरांसाठी मागणी वाढली आहे. रात्रीच्या अंधारात काळ्या मांजरी माणसांच्या मनात भीती तयार करतात. गेल्या शतकभरामध्ये काळ्या मांजरींविषयी असलेल्या अनास्थेचे आणि पिलांच्या कळपात काळे म्हणून फारसे लाड न होणाऱ्या मांजरांचे दिवस आता पालटले आहेत. ओएलएक्स आणि ऑनलाइन-ऑफलाइन पेटबाजारामध्ये काळ्या मांजरांच्या खरेदी-विक्रीचा व्यवहार पाहिला तर याची प्रचितीच येऊ शकेल. पेटबाजारामध्ये संपूर्ण काळ्या मांजरांच्या प्रजातींची ५ ते १५ हजार रुपयांपर्यंत विक्री होताना दिसत आहे. इतर स्थानिक जाती आणि रंगांच्या मांजरांपेक्षा काळ्या मांजरांची किंमत ही सर्वाधिक आहे.

अमेरिकन बॉबटेल, अमेरिकन कर्ल, अमेरिकन शॉर्ट हेअर, अमेरिकन वायरहेअर, बॉम्बेकॅट, इजिप्शन माऊ, ब्रिटिश शॉर्टहेअर, पर्शिअन ब्लॅक, नॉव्‍‌र्हेजिअन फॉरेस्ट कॅट, जापनीज बॉबटेल, स्कॉटिश फोल्ड या काळ्या मांजरीच्या काही लोकप्रिय प्रजाती आहेत. आपल्याकडे बहुतेक वेळा ‘बॉम्बे कॅट’ दिसतात. इतर साऱ्या मिश्र प्रजातींनुसार गडद-फिक्या आणि राखाडीकडे झुकणाऱ्या काळ्या मांजरी दिसतात.

जगात काय?

मध्ययुगीन युरोपात औद्योगिक आणि सांस्कृतिक क्रांतीची बीजे रोवली गेली. गंमत म्हणजे याच काळात संपूर्ण काळ्या मांजरीचा अपप्रचार युरोपमधून झाला. ब्रिटन आणि आर्यलडमध्ये काळ्या मांजरीला शुभ मानले जात होते. त्यामुळे त्यांचे आवाढव्य घरांमध्ये अस्तित्व अढळ होते. म्हाताऱ्या व्यक्ती आणि त्यांच्यासोबत राहणाऱ्या काळ्या मांजरांचा ताफा, यांवरून युरोपीय राष्ट्रांमध्ये जारण-मारण तंत्रासाठी काळ्या मांजराचा वापर होत असल्याची अफवा पसरली. मध्ययुगातील साहित्यामध्ये या अफवांच्या कथा, दंतकथा आढळतात. तरीही अमेरिका, ब्रिटन आणि जपानमध्ये काळ्या मांजरींना शुभ मानले जाते. इतर राष्ट्रांमध्ये काळ्या मांजरांना बाळगण्या किंवा न बाळगण्यामागे टोकाचा विरोधाभासी विचार आहे. घरात सौख्य वावरते यापासून घराला दारिद्रय़ लागते अशी उलट-सुलट विचारधारा या मांजरांच्याबाबत आहे.

मांजरप्रेम आणि मांजरपालनामध्ये जगामध्ये जपानी नागरिक अव्वलस्थानी आहेत. या देशाच्या साहित्य आणि सिनेमांमध्ये देखील मांजरांचा सहभाग मोठा आहे. तरुणी आपल्यासोबत काळ्या मांजरांना बाळगणे आकर्षक दागिना घालण्यासमान मानतात. ब्रिटन आणि अमेरिकेमध्ये देखील संपूर्ण काळी मांजर घरामध्ये आवडीने पाळली जाते. प्राण्यांसाठी लढणारी ‘कॅट प्रोटेक्शन’ ही ब्रिटनमधील संस्था दरवर्षी १७ ऑगस्ट या दिवशी ‘ब्लॅक कॅट अ‍ॅप्रिसिएशन डे’ साजरा करते. अंधश्रद्धेमुळे व अपसमजांमुळे जगातील अनेक भागांत लहानपणीच पूर्ण काळ्या मांजरींना मारून टाकले जाते. त्यात बदल घडावा, यासाठी समाजमाध्यमांवर देखील हा दिवस  साजरा होतो. अधिकाधिक लोकांना या मांजरींना दत्तक घेण्याचे आवाहन केले जाते. याशिवाय आपल्याकडच्या काळ्या मांजरांचे अनुभव समाजमाध्यमांवर मांडले जातात. याशिवाय २७ ऑक्टोबर रोजी ब्लॅक कॅट डेही साजरा केला जातो.

लौकिक सौंदर्याच्या पलिकडील स्फिंक्स

मांजर म्हणजे केसाळ, गुबगुबीत आणि त्यात शुभ्र पांढरी असेल तर अधिकच उत्तम अशी सार्वत्रिक धारणा. मात्र त्याला संपूर्णपणे छेद देणारी प्रजाती म्हणजे ‘स्फिंक्स’. अजिबात केस नसलेली, बारीक अंगचणीची ही मांजर. खरेतर ही काही नैसर्गिक प्रजाती नाही. साधारण १९६० च्या सुमारास ही प्रजाती तयार करण्यात आली. गेल्या काही वर्षांत या प्रजातीच्या मांजरांची मागणीही वाढते आहे. साधारण ८ ते १० हजार रुपये किंवा त्यापेक्षा अधिक किंमत या मांजरांना मिळते आहे.

उत्पादनांची रेलचेल

खास काळ्या मांजरीसाठी डिझाइन केलेले कपडे, पट्टे अशी उत्पादनांची रेलचेल पाळीव प्राण्यांच्या बाजारपेठेत आहे. ब्लॅक कॅट अवेअरनेस डेचे निमित्त साधून वेगळ्या रंगांच्या मांजरींनाही काळ्या रंगाचा साज चढवण्यासाठीही अनेक उत्पादने बाजारात उपलब्ध आहेत. त्याचबरोबर काळ्या मांजरींच्या ‘फर’ची चकाकी टिकण्यासाठी वेगळे शाम्पू, स्प्रे अशा उत्पादनांनी या मांजरींबाबतचे आकर्षण वाढवले आणि बाजारपेठेने आपले हित साधले आहे. काही संकेतस्थळे, परदेशातील पशू उत्पादनांची दुकाने येथे खास काळ्या मांजरीच्या वस्तूंसाठी स्वतंत्र कक्षही निर्माण करण्यात आला आहे.

या शिवाय काळ्या मांजरीला प्रतिष्ठा मिळवून देत बाजारपेठेने फॅशन विश्वातही नवा ट्रेंड रुजवला. काळ्या मांजरीच्या चित्रांची प्रिंट असलेल्या मोज्यांपासून ते कपडे, पर्स, दागिने, वॉलपेपर अशी अनेक उत्पादने ही फॅशन सिम्बॉल बनली. फॅशन जगतात या मांजरीचे प्रिंट असलेल्या हटके दिसणाऱ्या वस्तूंची मागणी टिकून आहे. ही अशुभ मानली गेलेली काळी मांजर बाजारपेठेला कायमच शुभ ठरत आली आहे.