पांढऱ्या शुभ्र कॅनव्हासवर काढलेले ब्रशचे चित्र.. कुंचल्याच्या आणखी काही फटकाऱ्यांनी काही सेकंदातच त्या ब्रशचे राजकन्येमध्ये झालेले रूपांतर.. प्रारंभी चितारलेल्या वर्तुळाला मिळालेल्या आकारातून कुणाला कासव दिसले, तर कुणाला राष्ट्रवादीचे चिन्ह असलेले घडय़ाळ.. वयाची नव्वदी पार केल्यानंतरही आपल्या समर्थ कुंचल्याची करामत दाखवीत ज्येष्ठ व्यंगचित्रकार शि. द. फडणीस यांनी सोमवारी शब्दविरहित चित्रांची अनोखी सफर घडविली. अनुभव वैश्विक असतो तेव्हा शब्दविरहित चित्र जगभर पोहोचते, या फडणीस यांच्या विधानाची प्रचिती त्यांनी रेखाटलेल्या व्यंगचित्रांतून रसिकांना आली.

फडणीस शनिवारी (२९ जुलै) वयाची ९२ वर्षे पूर्ण करीत आहेत. हे औचित्य साधून महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे आयोजित ‘मसाप गप्पा’ उपक्रमात प्रसिद्ध व्यंगचित्रकार चारुहास पंडित यांनी फडणीस यांच्याशी संवाद साधला. परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी आणि कोशाध्यक्षा सुनीताराजे पवार या वेळी उपस्थित होत्या.

कोल्हापुरातील शालेय जीवनात वसंत सरवटे यांच्यासमवेत दिलेल्या चित्रकलेच्या परीक्षा, चित्रांसाठी मिळालेली पारितोषिके आणि अंगी असलेली ही कला वाढविण्यासाठी मुंबईला जा असा शिक्षकांनी दिलेला गुरुमंत्र या आठवणींना फडणीस यांनी उजाळा दिला. ‘चित्र काढून काय करणार? रेघोटय़ा मारून काय मिळणार?, त्यापेक्षा पदवी घेतलीस तर नोकरी तरी मिळेल’, अशी घरच्यांना माझ्याविषयी वाटणारी चिंता रास्तच होती, असेही फडणीस यांनी सांगितले. गणेशोत्सवामध्ये मी नकला करायचो. नंतर मला नकला करण्यासाठी कॅनव्हास मिळाला. कोल्हापूरमध्ये बाबुराव पेंटर आणि बाबुराव सडवेलकर यांच्या प्रमाणबद्ध चित्रांचे संस्कार झाल्यामुळे माझी रेषा सरळ राहिली, अशा शब्दांत त्यांनी आपल्या कलाजीवनाचे मर्म सांगितले.

चुकलेले चित्र म्हणजे व्यंगचित्र अशी आपल्याकडे व्यंगचित्राविषयीची समज बाळबोध आहे. राजकीय टीकाचित्र म्हणजे व्यंगचित्र नव्हे. व्यंगचित्राची ती एक विकसित झालेली शाखा आहे, असे सांगून फडणीस म्हणाले,‘ हास्यचित्रांची वाट चित्रकलेतून जाते. जेव्हा शब्द थांबतात तेव्हा चित्र पुढे येते. चित्राला त्रिमिती येते तेव्हा शिल्प होते आणि शिल्पामध्ये चैतन्य व सूर येतो तेव्हा संगीताची निर्मिती होते. माझ्याकडे शब्द नाहीतच. मला रेषांतूनच बोलायचे आहे, अशी तालीम मिळाली. विषय कितीही क्लिष्ट आणि गहन असला तरी चित्रांतून तो सहजगत्या पोहोचतो.’ ‘माणसाच्या विचारातील विसंगती आणि चमत्कृती हा व्यंगचित्रांचा आत्मा आहे. हे विचारांचे नाते विद्वत्तेशी नाही, तर शहाणपणाशी आहे. कल्पना अमूर्त असते. ती अस्तित्वात येण्यासाठी चित्र, शिल्प, नृत्य, संगीत असे कलेचे माध्यम शोधत असते.

‘हंस’ अंकासाठी मी व्यंगचित्र चितारले होते. काही काळ राजकीय टीकाचित्रे काढून पाहिली. पत्रकारिताही करून पाहिली, पण घडय़ाळाच्या मागे धावणे जमणार नाही हे ध्यानात आल्यानंतर मी पत्रकारिता सोडून दिली. मुखपृष्ठाचे व्यासपीठ मला मिळाले,’ असेही फडणीस यांनी सांगितले.