पुणे शहरात डेंग्यूमुळे दहशतीचे वातावरण निर्माण झाले असताना शहरातील पोलीस ठाणे परिसरात डेंग्यूच्या अळ्या सापडल्या आहेत. शहरातील तब्बल १२ पोलीस स्टेशनच्या आवारात पाण्याची डबकी आणि डेंग्यूच्या अळ्या आढळल्या, अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य आधिकारी वैशाली जाधव यांनी दिली. या पोलीस स्टेशनला आरोग्य विभागाकडून नोटीस पाठवल्याचे देखील त्यांनी सांगितले.  पुणे शहरात स्वाइन फ्लू, चिकुनगुनिया आणि डेंग्यू या आजाराने डोकेवर काढले असून या रोगाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी पालिका युध्दपातळीवर प्रयत्न करताना दिसते.

या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या माध्यमातून नागरिकांमध्ये प्रबोधन करण्यात येत आहे. तसेच डेंग्यूच्या अळया किंवा पाण्याची डबकी आढळल्यास याप्रकरणातील जबाबदार असणाऱ्यांवर पालिकेकडून कारवाई करण्यात सुरुवात केली आहे. आतापर्यंत ८ हजार २७० खासगी तर ३ हजार ७१ शासकिय इमारतीमध्ये डेंग्यूच्या अळ्या सापडल्या आहेत. यातील ५ हजार जागांवर औषध फवारणी करण्यात आली असून ६७ सोसायट्यांवर दंडात्मक कारवाईच्या स्वरुपात १ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. त्याचबरोबर ४ हजार मिळकतींना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. या मोहिमेसाठी भरारी पथकांची नेमणूक करण्यात आली आहे.