डेंग्यूचा शहरातील प्रादुर्भाव अद्याप कमी झालेला नसून सप्टेंबरमध्ये केवळ १२ दिवसांत पुण्यात २०० संशयित डेंग्यूरुग्ण सापडले आहेत, तसेच ४३ चिकुनगुनियाच्या रुग्णांचीही नोंद झाली आहे.

पालिकेच्या कीटक प्रतिबंधक विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार १६ ऑगस्टपासून आतापर्यंत पालिकेने १० लाख ४७ हजार मालमत्तांचे डासांची पैदास तपासण्यासाठी सर्वेक्षण केले असून त्यात ६,३६६ ठिकाणी डासोत्पत्ती झालेली आढळली. या कारणासाठी पालिकेने आतापर्यंत २२४ ठिकाणी दंड केला आहे. एकूण २ लाख १३ हजार रुपयांचा दंड नागरिक व व्यावसायिकांना डासांची पैदास होऊ दिल्याबद्दल भरावा लागला आहे.

तापाच्या अनेक रुग्णांमध्ये सांधेदुखी व अंगदुखी ही लक्षणे दिसत असूनही त्यांच्या डेंग्यू व चिकुनगुनिया या दोन्ही चाचण्या ‘निगेटिव्ह’ येत असल्याचा अनुभवही रुग्ण घेत आहेत.

याबद्दल संसर्गजन्य रोगांचे तज्ज्ञ डॉ. भारत पुरंदरे म्हणाले, ‘‘ज्या रुग्णांच्या चाचण्या ‘निगेटिव्ह’ येत आहेत त्यांच्या चाचण्या योग्य वेळी झाल्या नसाव्यात. काही वेळा पहिल्या २-३ दिवसांत केलेली चाचणी ‘निगेटिव्ह’ आली तरी ८ ते १० दिवसांनी ती पुन्हा केल्यास ‘पॉझिटिव्ह’ येऊ शकते. चाचणी पुन्हा करणे आवश्यक असल्यास डॉक्टर तसे सांगतात. पुन्हा चाचणी केली न गेल्यास त्या रुग्णांचे डेंग्यू वा चिकुनगुनियाचा रुग्ण म्हणून निदान होत नसावे. परंतु हे दोन आजार सोडून दुसराच कुठल्या आजाराचा प्रादुर्भाव असेल असे मला वाटत नाही.’’

पुन्हा मुसळधार पावसाचा अंदाज, ‘तापवाढणार?

सध्या पुणे व परिसरात पाऊस नसला तरी बुधवारपासून पुन्हा पावसाचा अंदाज आहे. बुधवारी थांबून-थांबून, तर ऐन गणेश विसर्जनाच्या दिवशी- गुरुवार व शुक्रवारी मुसळधार पावसाचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे. त्यानंतरही रविवापर्यंत मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकेल. अधूनमधून पडणाऱ्या पावसाच्या सरींमुळे ठिकठिकाणी तसेच पडीक वस्तूंमध्ये पाणी साठून त्यात डासांची वाढ होण्यास अनुकूल वातावरण निर्माण होते. आताचा पाऊस तशा स्वरूपाचा झाला तर डासांची पैदास वाढून त्यांच्यावाटे पसरणाऱ्या तापांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता या निमित्ताने उपस्थित होते आहे.

पिंपरी-चिंचवडमध्ये केवळ ऑगस्टमध्ये तापाचे १२ हजार रुग्ण

पिंपरी-चिंचवडमध्ये केवळ ऑगस्ट महिन्यात तापाचे १२,२७६ रुग्ण सापडले असून जानेवारीपासून आतापर्यंत सापडलेल्या ताप रुग्णांची संख्या तब्बल ५७,८३० आहे. विशेष म्हणजे हे सर्व रुग्ण केवळ पालिकेच्या दवाखान्यांमध्ये सापडलेले आहेत. सर्व ताप रुग्णांची पिंपरी पालिकेने मलेरियाचे संशयित रुग्ण म्हणून नोंद केली असून मलेरियाच्या चाचण्यांनंतर त्यातील ४१ रुग्णांना मलेरिया असल्याचे आढळून आले. तसेच ऑगस्टमध्ये डेंग्यूचे ३९४ संशयित रुग्ण आणि चिकुनगुनियाचे ३ संशयित रुग्ण आढळले, अशी माहिती पिंपरी पालिकेने दिली. पालिकेचे अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे म्हणाले, ‘‘आम्ही तापाचे अधिकाधिक रुग्ण शोधतो तसेच कोणत्या प्रभागात अधिक रुग्ण आहेत त्यानुसार कीटक नियंत्रण विभागातर्फे उपाययोजना केल्या जातात. यात डास नियंत्रणाची कार्यवाही चांगल्या प्रकारे करता येत असून मागील वर्षी व यावर्षी आमच्याकडे डासांवाटे पसरणाऱ्या तापामुळे मृत्यूची नोंद नाही.’’