या आठवडय़ातही पावसाचा अंदाज
महिन्याच्या सुरुवातीला एकच दिवस शहराच्या काही भागात पडून गेलेल्या पावसाच्या जोरदार सरी आणि त्यानंतर एक ते दोन वेळा झालेला पावसाचा हलका शिडकावा या पाश्र्वभूमीवर जूनमध्ये डेंग्यूसदृश रुग्णांची संख्या वाढल्याचे दिसून येत आहे.
मोसमी पाऊस सुरू झालेला नसतानाच चालू महिन्यात पालिकेकडे ५१ डेंग्यूसदृश रुग्णांची नोंद झाली आहे, तर डेंग्यू असल्याचे निश्चित झालेले १० रुग्ण या कालावधीत सापडले आहेत. वर्ष सुरू होताना जोरात असलेल्या चिकुनगुनियाचे १० रुग्ण, तर विषमज्वराचे १२ रुग्ण सापडले आहेत. या वर्षी गतवर्षीच्या तुलनेत डेंग्यूरुग्णांची संख्या कमी होती. जानेवारीत शहरात ६२ डेंग्यूसदृश रुग्ण आढळले आणि त्यानंतर रुग्णसंख्या कमी झाली. डेंग्यू आजाराचे निश्चित निदान झालेले २७ रुग्ण जानेवारीत सापडले होते व याही रुग्णांची संख्या मध्यंतरीच्या काळात घटली होती. त्यानंतर जूनमध्येच १३ दिवसांत एकदम ६१ रुग्णांची नोंद झाली आहे.
मे महिना संपेपर्यंत पुण्याचे तापमान चढे राहिले होते, परिणामी डासांच्या माध्यमातून पसरणाऱ्या तापांचा प्रादुर्भाव तुलनेने कमी राहिला होता. मे अखेरीस अधूनमधून ढगाळ राहणारे हवामान जूनमध्ये सातत्याने ढगाळ राहू लागले. सध्याही हवामान ढगाळच असून चालू आठवडय़ात पुन्हा पुणे आणि परिसरासाठी हवामानशास्त्र विभागाने पावसाचा अंदाज दिला आहे. गुरुवारी आणि शुक्रवारी पुण्याच्या काही भागात पावसाच्या हलक्या सरी पडण्याची शक्यता आहे, तर शनिवारी व रविवारी अधूनमधून पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.