धनगर समाजातील आंदोलकांनी तोडफोडीमध्ये शक्ती वाया घालवू नये, असा सल्ला भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी बारामतीमध्ये दिला. धनगर समाजाचा अनुसूचित जमातीत समावेश करावा, या मागणीसाठी गेल्या आठवड्यापासून बारामतीमध्ये उपोषण सुरू आहे. या आंदोलनाचे लोण राज्यात पसरले असून, वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलकांनी दगडफेक आणि एसटी जाळल्याची घटना घडली आहे. त्या पार्श्वभूमीवर फडणवीस यांच्यासह महायुतीतील काही नेत्यांनी मंगळवारी उपोषणस्थळी जाऊन आंदोलनकर्त्यांची भेट घेतली. महायुतीतील नेत्यांच्या उपस्थितीत उपोषणकर्त्यांनी मंगळवारी दुपारी आपले उपोषण सोडले.
फडणवीस म्हणाले, मुंबई बारामतीपासून २५० किलोमीटर दूर आहे. तुम्ही इथे उपोषणाला बसला आहात आणि तिथे मुंबईत मंत्रालय हादरले आहे. तुमची शक्ती तुम्ही ओळखली पाहिजे. विनाकारण तोडफोडीमध्ये शक्ती वाया घालवू नका. त्याचबरोबर उपोषण तूर्त स्थगित करून अन्य शांततामय मार्गांनी आंदोलन सुरू ठेवता येईल, असेही आवाहन त्यांनी धनगर समाजातील नेत्यांना केले.
यावेळी राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर, शिवसेनेचे आमदार विजय शिवतारे यांचीही भाषणे झाली. भाजपचे प्रदेश प्रवक्ते माधव भंडारी हेदेखील फडणवीस यांच्यासोबत उपस्थित आहेत.