मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना ठणकावले
विकासाच्या मुद्दय़ावर भाजपला पराभूत करता येत नाही हे ध्यानात आल्यामुळेच काँग्रेस आणि डाव्या पक्षांकडून हे सरकार दलित, आदिवासी आणि शेतकरीविरोधात असल्याच्या वैचारिक अफवांचे पीक पसरवत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार आणि राज्य सरकारतर्फे दलित आणि आदिवासींसाठी विकास कार्यक्रमांची अंमलबजावणी करून काँग्रेस आणि डाव्यांची मक्तेदारी कायमस्वरूपी मोडून काढल्याशिवाय थांबणार नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी विरोधकांवर टीका केली. आमच्यासाठी समता आणि समरसता केवळ भाषणापुरती नाही तर कृतीमध्ये आणण्याची गोष्ट आहे, असे त्यांनी ठणकावून सांगितले. सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांच्या जनसपंर्क कार्यालयाचे उद्घाटन फडणवीस यांच्या हस्ते झाले.
* दप्तर दिरंगाई संपवून पारदर्शी कारभार करण्यासाठी भाजप सरकारने ऑनलाइन पद्धतीचा अवलंब केला आहे.
* आपले सरकार या बेव पोर्टलच्या माध्यमातून सेवा हमी कायद्यांतर्गत आतापर्यंत १५० सेवा उपलब्ध करून दिल्या आहे.
* त्याला प्रतिसाद दिल्यानंतर जनतेची कामे भ्रष्टाचारमुक्त आणि विनाविलंब होण्याचे प्रमाण ९९ टक्के आहे. २ ऑक्टोबपर्यंत २५० सेवांचा अंतर्भाव करण्यात येणार.
* ही सुविधा मोबाइल अ‍ॅपवर देण्याचा विचार आहे, असे फडणवीस यांनी सांगितले.