शहरातील वाहतुकीवर सॅटेलाइटच्या माध्यमातून लक्ष ठेवले जाणार आहे. शहरातील सर्व सिग्नल आणि काही महत्त्वाच्या रस्त्यावरील वाहतुकीच्या माहितीचा ‘डिजिटल नकाशा’ वाहतूक पोलिसांकडून बनविण्याचे काम सुरू आहे. त्याच्या माध्यमातून वाहतूक नियंत्रण कक्षात बसून पोलिसांना वाहतुकीच्या सद्य:स्थितीची माहिती मिळेल. त्या माहितीवरून वाहतूक कोंडी सोडविण्यास या डिजिटल नकाशाची मदत होणार आहे.
पुणे शहराची सर्वात मोठी समस्या ही वाहतूक कोंडी आहे. शहरात साधारण तीनशेपेक्षा जास्त सिग्नल असून त्यापैकी काही पादचारी सिग्नल आहेत. शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न सुरू केले आहेत. वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी सिग्नल आणि काही महत्त्वाच्या रस्त्यांचा सॅटेलाइटच्या माध्यमातून डिजिटल नकाशा तयार करण्याचे काम सुरू केले आहे. प्रायोगिक तत्त्वावर ३५ सिग्नलचा नकाशा तयार करून वाहतुकीची माहिती घेण्याचे काम पूर्ण केल्यानंतर शहरातील २८० सिग्नलचा डिजिटल नकाशा तयार करण्याचे काम सुरू आहे. ‘बर्ड आय’ ही एजन्सी हा नकाशा बनविण्याचे काम करीत आहे.  याबाबत वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त सारंग आवाड यांनी सांगितले, की शहरातील वाहतुकीवर नजर ठेवण्यासाठी सॅटेलाइटच्या माध्यमातून डिजिटल नकाशा तयार करण्याचे काम सुरू आहे.  या नकाशामध्ये कोणत्या चौकात वाहतूक सुरळीत सुरू आहे. कोणत्या ठिकाणी वाहतूक कोंडी झाली, कोठे धिम्या गतीने वाहतूक सुरू आहे याची माहिती रंगावरून तत्काळ नियंत्रण कक्षाला दिसेल. त्यासाठी चार रंग निवडण्यात आले आहेत. त्यानुसार तत्काळ त्या सिग्नलच्या ठिकाणी असलेल्या कर्मचारी किंवा अधिकाऱ्याला त्याची माहिती दिली जाईल. त्या ठिकाणची वाहतूक कोंडी सोडविली जाईल. प्रत्येक सिग्नलच्या परिसरात सॅटेलाइटची रेंज देण्यात आली आहे. सिग्नल थांबल्यानंतर उभे असलेली वाहतूक ही काही ठरावीक अंतराच्या पुढे गेल्यानंतरही वाहतूक कोंडी झाल्याचे समजणार आहे. तसेच, एखाद्या व्यक्तीने वाहतूक नियंत्रण कक्षाला फोन करून वाहतूक कोंडीची माहिती दिल्यानंतर त्या सिग्नलचे नाव टाकल्यानंतर एका क्लिकवर त्या सिग्नलाची माहिती नियंत्रण कक्षात दिसेल. त्यानुसार त्या ठिकाणची वाहतूक कोंडी तत्काळ दूर केली जाईल.
सिग्नलबरोबरच रस्त्याच्या मध्ये एखाद्या ठिकाणी अपघात झाल्यामुळे किंवा एखाद्या दुसऱ्या कारणामुळे वाहतूक कोंडी झाली, तर त्याची माहिती सुद्धा या नकाशावर दिसेल. नकाशात कोणत्या बाजूने वाहतूक कोंडी झाल्याची आहे हे सुद्धा दिसणार असल्यामुळे तत्काळ गस्तीवर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना त्या ठिकाणाची माहिती दिली जाईल. पोलीस कर्मचारी वाहतूक कोंडी दूर करण्याचे प्रयत्न करतील. येत्या काही दिवसांत डिजिटल नकाशाद्वारे काम सुरू केले जाईल. डिजिटल नकाशाच्या माध्यमातून काम सुरू झाल्यास बऱ्यापैकी वाहतूक कोंडी दूर होण्यास मदत होणार असल्याचे आवाड यांनी स्पष्ट केले.