एव्हरेस्ट शिखर सर केल्याचा दावा करणारे पुणे पोलीस दलातून निलंबित करण्यात आलेले पोलीस दाम्पत्य दिनेश राठोड आणि तारकेश्वरी राठोड हे गेल्या वर्षभरापासून गैरहजर आहेत. राठोड दाम्पत्याची विभागीय चौकशी करण्यात आली आहे. चौकशीत त्यांना बाजू मांडण्याची संधी देण्यात आली. मात्र, राठोड दाम्पत्याकडून एव्हरेस्ट सर करण्यात आल्याचा कोणताही पुरावा सादर करण्यात आला आहे. राठोड दाम्पत्यावर करण्यात येणाऱ्या शिस्तभंगाची कारवाईची प्रक्रिया अंतिम टप्यात आहे, असे पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.

राठोड दाम्पत्य सन २०१६ मध्ये एव्हरेस्ट सर करण्याच्या मोहिमेसाठी नेपाळला रवाना झाले. त्यांना मोहिमेवर जाण्यासाठी शासनाकडून परवानगी देण्यात आली. सन २० एप्रिल २०१६ रोजी ते रवाना झाले. गिर्यारोहण मोहीम संपल्यानंतर त्यांनी कामावर रुजू होणे आवश्यक होते. मोहिमेचा अहवाल देखील त्यांनी सादर केला नाही. तेव्हापासून ते कोणतीही परवानागी न घेता गैरहजर आहेत. राठोड दाम्पत्याने एव्हरेस्ट सर केल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले. तेव्हा त्यांनी वृत्तपत्रांकडे पाठवलेली छायाचित्रे बनावट असल्याचे उघड झाल्याच्या तक्रारी आल्या. त्यांची प्राथमिक चौकशी करण्यात आली, तेव्हा त्यांच्याकडून कोणताही ठोस पुरावा सादर करण्यात आला नाही, असे शुक्ला यांनी सांगितले.

त्या म्हणाल्या, की नेपाळ सरकारच्या पर्यटन विभागाकडून एव्हरेस्ट सर केल्याबाबत प्रमाणपत्र मिळवण्यासाठी छायाचित्रे सादर करावी लागतात. राठोड दाम्पत्याने नेपाळ सरकारच्या पर्यटन विभागाला बनावट छायाचित्र सादर करून प्रमाणपत्र मिळवले. नेपाळ सरकारने राठोड दाम्पत्याचे प्रमाणपत्र रद्द करून त्यांना नेपाळमध्ये गिर्यारोहणासाठी दहा वर्षांची मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे देश तसेच महाराष्ट्र पोलिसांची बदनामी झाली. चौकशीत या बाबी उघड झाल्यानंतर सन १५ ऑक्टोबर २०१६ रोजी राठोड दाम्पत्याला पोलीस सेवेतून निलंबित करण्यात आले. निलंबन आदेशाविरुद्ध राठोड दाम्पत्याने सन १४ फेब्रुवारी २०१७ रोजी महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणात (मॅट) याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी झाली. पुणे पोलिसांकडून प्रतिज्ञापत्राद्वारे सत्यस्थिती ‘मॅट’ पुढे मांडण्यात आली. त्यानंतर राठोड दाम्पत्याकडून याचिका मागे घेण्यात आली.

राठोड दाम्पत्याकडून आरोप

आम्ही एव्हरेस्ट शिखर सर केले आहे. नेपाळ सरकारकडून आमच्यावर बंदी घालण्यात आली नाही. तसा आदेश आमच्यापर्यंत आला नाही. पोलीस आयुक्तांनी आकसबुद्धीने आमच्यावर कारवाई केली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पदाचा गैरवापर केला आहे. त्यांनी आमचा मानासिक छळ केला आहे तसेच समाजात बदनामी केली आहे, असा आरोप राठोड दाम्पत्याने शुक्रवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला. या प्रसंगी विश्व गोर बंजारा सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड. रमेश राठोड, पदाधिकारी युवराज आडे उपस्थित होते.