राष्ट्रीय चित्रपट व दूरचित्रवाणी संस्थेत (एफटीआयआय) नव्याने प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांकडून संस्थेतर्फे भरुन घेतल्या जाणाऱ्या शपथपत्रातील मजकुरावरुन प्रशासन व विद्यार्थी यांच्यात पुन्हा वाद उभा राहण्याची चिन्हे आहेत. संस्थेतील शिस्तपालनाविषयीचे विविध मुद्दे या शपथपत्रात आहेत. असे पत्र भरुन घेणे म्हणजे एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांना शिशुवर्गातील मुले समजण्याचाच प्रकार आहे, अशा शब्दांत सध्याचे विद्यार्थी नाराजी व्यक्त करत आहेत, तर शपथपत्र पूर्वीपासूनच भरुन घेतले जात असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.

शंभर रुपयांच्या मुद्रांकावर विद्यार्थ्यांनी हे शपथपत्र भरुन द्यायचे आहे. ‘संस्थेतील नियमांचा भंग झाल्यास माझ्यावर कारवाई करण्याचा अधिकार संस्थेस असेल. नियमभंगासाठी केव्हाही दंड ठोठावला गेल्यास मी तो भरीन. ध्वनी प्रदूषणाविषयीच्या नियमांचे पालन करणे मला मान्य असून त्याबाबत कायदेशीर कारवाई झाल्यास मी जबाबदार राहीन. शिक्षक, कर्मचारी व वडीलधाऱ्यांचा अपमान करणार नाही. बाहेरील व्यक्तींना मी वसतिगृहात राहण्यास देणार नाही व तशी गरज भासल्यास पूर्वपरवानगी घेईन. सुरक्षा कर्मचाऱ्यांना सहकार्य करीन. संस्थेचे संपूर्ण शुल्क मी आगाऊ भरीन व शुल्कातून सूट मिळावी यासाठी कोणत्याही प्रकारचा बाह्य़ वा भावनिक दबाव मी संस्थेवर आणणार नाही,’ असे मुद्दे त्यात आहेत. ‘‘रॅगिंग’विरोधी तरतूद सोडली तर शपथपत्र नवीन आहे. कसे वागायचे हे माहीत नसायला आम्ही शिशुवर्गातील मुले नाही. असुरक्षिततेच्या भावनेतून अशी पत्रे घेतली जात आहेत,’ अशी टीका काही विद्यार्थ्यांनी केली. ‘शपथपत्रावर अधिक विचार करुन व कायदेशीर बाबी जाणून घेऊन आम्ही आमची बाजू मांडू,’ असे संस्थेच्या विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष हरीशंकर नाचीमुथ्थू यांनी सांगितले.

एफटीआयआय प्रशासनामधील उच्चपदस्थ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या अडीच ते तीन महिन्यांत संस्थेत शिस्तीच्या उल्लंघनाच्या विविध घटना घडल्या आहेत. ‘एका विद्यार्थ्यांने काही दिवसांपूर्वी एका शिक्षकाला इंग्रजीत अपशब्द वापरलेली ई-मेल पाठवली होती. अपशब्दांबरोबर या शिक्षकास ‘तुम्ही अपात्र व निरुपयोगी आहात,’ अशा आशयाचा मजकूरही पाठवण्यात आला होता. त्यानंतर ज्येष्ठ अभिनेते टॉम अल्टर यांना काही विद्यार्थ्यांनी अपमानास्पद वागणूक दिल्याने त्यांनी अभिनय विभागाच्या प्रमुखपदाचा राजीनामाच दिला व संस्थेने प्रचंड प्रयत्न केल्यानंतर ते राजीनामा मागे घेण्यास तयार झाले. एकदा दूरचित्रवाणी विभागाची सात मुले-मुली मद्यधुंद अवस्थेत फिरत असल्याचे संचालकांनी पाहिले होते व त्यांना तंबी दिली होती. शिवाय छायालेखनाच्या वर्गात शिकवणाऱ्या प्राध्यापकांना एका विद्यार्थ्यांने भरवर्गात ‘तुम्ही बकवास शिकवता, मला तुमच्याकडून शिकायचे नाही,’ असे सुनावले होते व अशा प्रकारे अपमान होणार असेल तर आपण शिकवणारचनाही असे पत्र छायालेखनाच्या प्राध्यापकांनी प्रशासनास दिले होते,’ अशी माहिती सूत्रांनी दिली.

‘‘हे हमीपत्र नवीन नसून ते २०१४ पासून भरुन घेतले जात आहे. त्या वेळी संस्थेच्या संचालक मंडळाचे अध्यक्ष सईद अख्तर मिर्झा होते, तर संस्थेचे संचालक डी. जे. नारायण होते. असे नियम सर्व शिक्षणसंस्थांमध्ये असून अशी हमीपत्रेही घेतली जातात.’’

– भूपेंद्र केंथोला, संचालक, एफटीआयआय