मतदार यादीतून नावे गायब होण्याच्या प्रकारामुळे हजारो मतदारांना गुरुवारी मतदानापासून वंचित राहावे लागले. नाव वगळण्यात आल्यामुळे झालेला मनस्ताप आणि भर उन्हात नाव शोधण्यासाठी करावी लागलेली वणवण यामुळे हजारो मतदारांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. मतदानापासून वंचित राहावे लागलेल्या हजारो मतदारांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेराव घातल्यानंतर ‘आलेल्या तक्रारी राज्य निवडणूक आयुक्तांमार्फत केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पाठवून देऊ’ अशी भूमिका जिल्हाधिकाऱ्यांनी आंदोलकांसमोर रात्री जाहीर केली.
पुण्यातील मतदानाला गुरुवारी सकाळी उत्साहात प्रारंभ झाला आणि थोडय़ाच वेळात यादीत नाव सापडत नसल्याच्या तक्रारी सुरू झाल्या. तासाभरातच या तक्रारी एवढय़ा वाढल्या की सर्व बूथवर तसेच मतदान केंद्रांमध्ये यादीतील नाव शोधणे हाच उद्योग सुरू झाला. फेब्रुवारी २०१२ मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत मतदान केले होते, त्यानंतर पत्ता बदललेला नाही मग यावेळी यादीतून नाव गायब कसे झाले, असा प्रश्न पुणेकर विचारत होते.
नागरिकांचे आंदोलन, घेराव
याद्यांमधील या गोंधळामुळे मतदानापासून वंचित राहिलेल्या संतप्त नागरिकांनी सायंकाळी विधान भवन येथे जिल्हाधिकाऱ्यांना घेराव घातला. यापूर्वीच्या मतदानात वेळोवेळी मतदान केलेले हे नागरिक निवडणूक ओळखपत्र तसेच अन्य पुरावेही बरोबर घेऊन आले होते. मतदानाचा हक्क मिळालाच पाहिजे अशी त्यांची मुख्य मागणी होती. या मागणी नंतर जिल्हाधिकाऱ्यांनी नागिरकांसमोर येत ध्वनिवर्धकावरून माहिती दिली. ते म्हणाले की, या तक्रारीसंबंधी राज्याच्या मुख्य निवडणूक आयुक्तांशी दूरध्वनीवरून चर्चा झाली आहे. ज्यांचे मतदान होऊ शकले नाही त्यांचे लेखी निवेदन घ्यावे तसेच राजकीय पक्षांची निवेदने घेऊन जिल्हा प्रशासनाचा अहवाल सोबत जोडावा, असे त्यांनी सांगितले आहे. मी त्यासंबंधी सकारात्मक अहवाल देईन. तो राज्यामार्फत केंद्राला पाठवला जाईल.
भाजप, मनसे, आपचा इशारा
महायुतीचे उमेदवार अनिल शिरोळे, प्रदीप रावत, राजेश पांडे आदींनी जिल्हाधिकारी सौरभ राव यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले. जिल्हाधिकाऱ्यांकडून समाधानकारक खुलासा न आल्यास शुक्रवार (१८ एप्रिल) पासून बेमुदत उपोषण करण्याचा इशारा शिरोळे यांनी यावेळी दिला. आम आदमी पक्षाचे उमेदवार प्रा. सुभाष वारे यांनीही नावे संशयास्पदरीत्या गायब झाल्याचा हा प्रकार सत्ताधाऱ्यांनी प्रशासनाच्या साहाय्याने घडवून आणला आहे, असा आरोप केला असून मतदानापासून वंचित राहिलेल्यांना १६ मे पूर्वी मतदानाची संधी मिळालीच पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. काँग्रेसचे उमेदवार विश्वजित कदम यांनी प्रशासकीय यंत्रणा हाताशी धरून हजारो मतदारांना मतदानापासून वंचित ठेवले आहे. या प्रकरणाचा तीव्र निषेध करत संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी मनसेचे उमेदवार दीपक पायगुडे यांनी पत्रकार परिषदेत केली.

नक्की काय घडले..?
– पुण्याच्या यादीतील हजारो नावे गायब
– नावे जाणावपूर्वक गायब केल्याच्या तक्रारी
– वंचित मतदारांचा जिल्हाधिकाऱ्यांना घेराव
– भाजप, मनसे, आपकडून आंदोलन सुरू