काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष भाऊसाहेब भोईर व विरोधी पक्षनेते विनोद नढे यांचे 27satheनिलंबन मागे घेण्याचे आदेश प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिले आहेत. त्याचवेळी, विरोधी पक्षनेतेपदावरून नढे यांच्या उचलबांगडीवरही शिक्कामोर्तब केले आहे. आजी-माजी शहराध्यक्ष व त्यांच्या समर्थकांच्या वादावर तोडगा काढताना प्रदेशाध्यक्षांनी दोन्ही गटाला समान न्याय देण्याचा प्रयत्न केला असला तरी हे ‘पॅचअप’ म्हणजे वरवरची मलमपट्टी असून मूळ जखम कायम आहे.
भोईर व साठे यांच्यातील गटबाजीच्या राजकीय वादावर तोडगा काढण्यासाठी प्रदेशाध्यक्षांनी माजी खासदार तुकाराम रेंगे पाटील व माजी आमदार मधू चव्हाण यांना निरीक्षक म्हणून शहरात पाठवले होते. दोन्ही गटांनी परस्परांविषयीच्या तीव्र भावना त्यांच्याकडे व्यक्त केल्या. सर्वाशी चर्चा करून निरीक्षकांनी प्रदेशाध्यक्षांना अहवाल दिला. त्यानुसार, भोईर गटाच्या मागणीनुसार निलंबनाची कारवाई मागे घेण्यात आली. तर, साठे गटातील पदाधिकाऱ्यांच्या मागणीनुसार, नढे यांचाही राजीनामा घेण्यात येत आहे. नव्या विरोधी पक्षनेतेपदासाठी दोन डिसेंबरला नगरसेवकांची बैठकही लावण्यात आली आहे. तथापि, हे ‘पॅचअप’ मनापासून मान्य होण्यासारखे नसल्याने दोन्हीकडील धुसफूस कायम राहण्याची चन्हे आहेत. दोन्ही गटांचे एकमेकांवरील आक्षेप जसेच्या तसे आहेत. त्यावर अपेक्षित चर्चा झाली नसल्याचा सूर पक्षकार्यकर्त्यांमध्ये आहे.