पिंपरी चिंचवड भागात अनधिकृत उत्खनन पिंपरी चिंचवडमधील भोसरी, पिंपरी वाघेरे भागात मेट्रोच्या कामासाठी अनधिकृत खोदाई केल्याचे निदर्शनास आले आहे. त्याची गंभीर दखल घेत जिल्हा प्रशासनाने महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनला (महामेट्रो) तब्बल २१ लाखांचा दंड ठोठावला आहे. मेट्रो प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात मार्गिका क्रमांक एकवरील स्वारगेट ते पिंपरी चिंचवड दरम्यान होणाऱ्या पिंपरी चिंचवड ते रेंजहिल्स या सुमारे १०.७५ किलोमीटर लांबीच्या मार्गात खांब उभे करण्यासाठी पिंपरी वाघेरे (खराळवाडी परिसर) येथे ६५.२४९ ब्रास, भोसरी येथील नाशिकफाटा, आयसीसी डीजीटीपी इमारत परिसरात १६६.१९३ ब्रास, पिंपरी वाघेरे (वल्लभनगर एस. टी. स्थानक परिसर) येथे ४७०.२१३ ब्रास असे एकूण ७०१.६५५ चौरस मीटर क्षेत्रामध्ये अनधिकृत खोदाई केल्याची तक्रार जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त झाली होती. त्यानंतर अपर तहसीलदार गीतांजली शिर्के यांच्याकडून तक्रारीची खातरजमा करुन त्याबाबतचा अहवाल तयार करण्यात आला. त्यात ७०१.६५५ चौ. मीटर क्षेत्रात मेट्रो प्रकल्पासाठी अनधिकृत खोदाई झाल्याचे आणि माती व मुरुमाचे उत्खनन जास्त झाल्याचे निदर्शनास आल्याचे नमूद करण्यात आले आहे. याबाबत जिल्हा प्रशासनाकडून महामेट्रो प्रशासनाकडून खुलासा मागविण्यात आला. महामेट्रो प्रशासनाने अनधिकृत खोदाई केल्याचे मान्य करत शासन नियमानुसार रॉयल्टी भरण्यास तयार असल्याचे कळविले आहे. अनधिकृत खोदाई केल्याप्रकरणी २० लाख ९८ हजार १२५ दंड जिल्हा प्रशासनाकडून ठोठावण्यात आला असून ही रक्कम दहा दिवसांच्या आत जमा करण्याचे आदेश दिले आहेत. दिलेल्या मुदतीत रक्कम न भरल्यास जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम १७६ नुसार सक्तीच्या उपायाने दंड वसूल करण्यात येईल, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र मुठे यांनी दिली. दंडाचा तपशील एकूण रक्कम ब्रासची रॉयल्टी २ लाख ८० हजार ६६२ अर्ज फी ५०० भूपृष्ठ भाडे ५१९ टीसीएस/शिक्षणकर ६ हजार १७४ विक्रीकर २८ हजार ६६ जिल्हा खनिज प्रतिष्ठान २८ हजार ६६ चालू बाजार भावाने पाच पट दंड १७ लाख ५४ हजार १३८ एकूण २० लाख ९८ हजार १२५ रुपये