दिवाळी शनिवार, रविवारी असल्याने लवकर रवाना

परदेशांत स्थायिक झालेल्या आणि मायदेशातून येणाऱ्या फराळाची चव चाखण्यासाठी उत्सुक असलेल्यांच्या घरी यंदा दिवाळीचा गोडवा वेळेआधीच पोहोचत आहे. दिवाळी शनिवार, रविवार या सुटीच्या दिवशी आहे. या दिवशी परदेशी कुरिअर बंद असतात. त्यामुळे दिवाळीचा मुहूर्त निसटून जाऊ नये म्हणून भारतातून फराळ पाठवणाऱ्यांनी आठवडाभर आधीच लाडू, चकल्या, करंज्या पाठवल्या आहेत.

परदेशांत स्थायिक झालेले भारतीय तिथेही आपले सण उत्साहाने साजरे करतात. दिवाळी म्हणजे तर आनंदाची पर्वणी असते. परदेशात अस्सल भारतीय चवीचा फराळ मिळणे कठीणच असते. त्यामुळे गेल्या कित्येक वर्षांपासून भारतातून तिथे कुरिअरद्वारे फराळ पाठवला जाऊ लागला आहे. यंदा दिवाळी सुटीच्या दिवशी असल्याने फराळ सात-आठ दिवस आधीच रवाना झाला असल्याची माहिती विक्रेत्यांनी दिली.

दिवाळीत अमेरिका, इंग्लंड, जर्मनी, सिंगापूर, इटली, स्पेन, कॅनडा, दुबई, कतार, ऑस्ट्रेलिया, न्यूझिलंडमध्ये फराळ पाठविला जातो. हा फराळ किमान एक महिना टिकेल अशा पद्घतीनेच तयार करण्यात येतो, असे कुलकर्णी ब्रदर्सचे श्रीपाद कुलकर्णी यांनी सांगितले. यंदा डाळींच्या किमती वाढल्याने फराळाच्या किमतीही वाढल्या आहेत. शिवाय कुरिअर आणि पॅकिंग चार्जेस वाढल्याने फराळ गतवर्षीच्या तुलनेत यंदा १० ते १५ टक्क्यांनी महागला आहे.

सुरस फुडचे सुनील शेवडे म्हणाले, गेल्या शुक्रवारपासूनच फराळ परदेशी पाठविण्यास सुरुवात झाली आहे. घरचा फराळ परदेशी पाठविण्यासाठी यंदा आम्ही ग्राहकांसाठी कमी दरात एक वेगळी सोय उपलब्ध करून दिली आहे. डोंबिवलीतील डीएनएस

बँकेजवळ लावण्यात आलेल्या स्टॉलमध्ये परदेशी पाठविण्यासाठी फराळ उपलब्ध करून देण्यात आला आहे. यंदा तेलविरहित शंकरपाळ्या आणि चकली आम्ही घेऊन आलो आहोत. त्यामुळे हे दोन पदार्थ जास्त प्रमाणात पाठविण्याकडे ग्राहकांचा कल आहे.

ऑनलाईन फराळ नोंदणीत २५ टक्क्यांनी वाढ

सर्वत्र ऑनलाईन शॉपिंगचा ट्रेण्ड वाढत असून दिवाळीची फराळ खरेदीही त्याला अपवाद नाही. डोंबिवलीतील दुकानदारांनी गेल्यावर्षीपासून फराळासाठी ऑनलाईन नोंदणीचा पर्याय ग्राहकांसमोर ठेवला आहे. गेल्यावर्षी केवळ दोन टक्के ग्राहकांनी फराळ ऑनलाईन खरेदी केला होता. यंदा २५ ते ३० टक्के ग्राहकांनी ऑनलाईन खरेदी केल्याचे कुलकर्णी यांनी सांगितले. परदेशातील ग्राहकांबरोबरच महाराष्ट्रातील सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे, सोलापूर इत्यादी भागांतील ग्राहकांनीही ऑनलाईन फराळाची मागणी केली आहे.