सलग आलेल्या सुटय़ांमुळे यंदा अनेकांनी दिवाळीला घरी राहण्याऐवजी पर्यटन करण्यावर भर दिला आहे. शहरातील गजबजाटापासून दूर, परंतु पुण्यापासून जवळ असलेल्या कोकणामध्येच दिवाळी साजरी करण्याला प्राधान्य देण्यात आले आहे. महागाईच्या दिवसांमध्ये खिशाला परवडणारे आणि निवासासाठी सुरक्षित या वैशिष्टय़ांमुळे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या (एमटीडीसी) रिसोर्टला सर्वाधिक पसंती मिळाली आहे.
सरकारी कार्यालयांना ११ ते १४ नोव्हेंबर अशी दिवाळीची सुटी आहे आणि दिवाळीला जोडून रविवार आला आहे. त्यामुळे शासकीय कर्मचाऱ्यांना पाच दिवसांच्या सुटीचा आनंद घेता येणार आहे. वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनीही दिवाळीची सुटी आणि रजा यांचे गणित जुळवून सलग सुटय़ा अनुभवण्यासाठी कुटुंबीयांसमवेत पर्यटनाला प्राधान्य दिले आहे. कोकण विभागातील गणपतीपुळे, हरिहरेश्वर, तारकर्ली, बोर्डी या ठिकाणच्या समुद्र किनाऱ्याजवळील एमटीडीसीचे रिसोर्ट हे नोव्हेंबरअखेपर्यंत हाऊसफुल्ल आहेत. तर, डिसेंबर महिन्यांतील शनिवार-रविवार म्हणजेच विकेंडचेही आगाऊ आरक्षण करण्यात आले आहे.
महाबळेश्वर, ताडोबा, अजंठा, कार्ला या ठिकाणांना पर्यटकांचा चांगला प्रतिसाद लाभला आहे. स्थानिक नागरिकांना रोजगार मिळावा यासाठी एमटीडीसीने निवास-न्याहरी हा अभिनव उपक्रम सुरू केला आहे. ही व्यवस्था कोठे उपलब्ध आहे याची माहिती एमटीडीसीच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. एमटीडीसीखेरीज खासगी टूरिस्ट हॉटेलचे आरक्षण आले असून वर्षअखेरीपर्यंत हीच परिस्थिती असेल, अशी माहिती पर्यटन विभागाच्या अधिकाऱ्याने दिली.