ललित साहित्य, गूढकथा-रहस्यकथा, ज्योतिष, विनोद, आरोग्य, चित्रपट, पर्यटन, क्रीडा, पाककृती, आध्यात्म अशा विविध विषयांसह महिला आणि बालकुमार यांना डोळ्यासमोर ठेवून प्रकाशित झालेल्या दिवाळी अंकांचे ‘अक्षरधन’ मंगळवारी धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर वाचकांसाठी खुले झाले. ऋतुरंग, अंतर्नाद, किस्त्रीम, पुण्यभूषण या अंकांना मागणी असून मौज, ग्रहांकित, दीपावली, ललित या अंकांची वाट पाहण्यात येत आहे.
‘अक्षरधारा’तर्फे ‘माय मराठी शब्दोत्सवां’तर्गत भरविण्यात आलेल्या दिवाळी अंकांच्या दालनाचे उद्घाटन ज्येष्ठ व्यंगचित्रकार शि. द. फडणीस यांच्या हस्ते झाले. ‘मनोरंजन’ या मराठीतील पहिल्या दिवाळी अंकाचे पुनर्मुद्रण करण्यात आले असून त्याचे प्रकाशन ‘अंतर्नाद’चे संपादन भानू काळे यांच्या हस्ते झाले. लेखक प्रा. मिलिंद जोशी आणि रसिका राठिवडेकर या वेळी उपस्थित होत्या.
कर्नाटकमध्ये कोणत्याही पुस्तकाच्या तीनशे प्रती राज्य सरकारकडून खरेदी केल्या जातात. त्यामुळे प्रकाशकाला दिलासा मिळतो. अशी कोणतीही सुविधा महाराष्ट्रामध्ये नाही याकडे लक्ष वेधून भानू काळे म्हणाले,की संस्कृतीचे प्रतििबब उमटणाऱ्या दिवाळी अंक परंपरेचे जतन करण्याची जबाबदारी मराठी वाचकांची आहे. मासिकांची परंपरा क्षीण झाली आहे. लेखक स्थिरावण्यासाठी दिवाळी अंक मोलाची कामगिरी बजावतात. सध्या वृत्तपत्रांना मोठा अवकाश असलेले लेखन नको असते. त्यामुळे साहित्यिकांसाठी दिवाळी अंक हेच व्यासपीठ उरले आहे.
‘अंतर्नाद’ दिवाळी अंकातील ‘आहे मनोहर तरी’ या पुस्तकाच्या परीक्षणामुळे सुनीताबाई देशपांडे यांनी संपर्क साधला आणि पुलंच्या घरी जाण्याचा खुला झालेला रस्ता हा किस्सा मिलिंद जोशी यांनी सांगितला. आपली आर्थिक ऐपत सांस्कृतिक समृद्धी वाढविण्यासाठी वापरतोका, हा खरा प्रश्न आहे. स्वत्व आणि सत्त्व हरवलेलय़ा विचारांने कुपोषित समाज परवडणारा नाही. त्यामुळे वाचकांनी दिवाळी अंक खरेदी करण्याबरोबरच धनिकांनी या अंकांना जाहिराती देत सांस्कृतिक कर्तव्य पार पाडावे. सुनील चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले.