प्रकाशाच्या झगमगत्या सणाचे स्वागत करण्यासाठी आतुर झालेल्या पुणेकरांनी रविवारच्या सुटीला खरेदीची दिवाळी केली. दिवाळीपूर्वीचा रविवार असल्याने खरेदीसाठी लक्ष्मी रस्त्यावर आलेल्या नागरिकांच्या गर्दीने वाहतुकीची कोंडी झाली होती. लक्ष्मी रस्त्यावरील दुकानांमध्ये लक्ष्मी खेळती राहिली. खरेदी करताना हाताशी रक्कम असावी या उद्देशातून अनेकांनी पैसे काढण्यासाठी विविध बँकांच्या ‘एटीएम’मध्ये रांगा लावल्या होत्या.

वसुबारस या तिथीपासून म्हणजेच बुधवारपासून (२६ ऑक्टोबर) दिवाळीला प्रारंभ होत आहे. शाळांच्या सहामाही परीक्षा संपल्या असून दिवाळीपूर्वी आलेल्या अखेरच्या रविवारी खरेदी करण्यासाठी सकाळपासून नागरिकांनी सहकुटुंब गर्दी केली होती.

शहराच्या मुख्य भागातील बाजीराव रस्ता, टिळक रस्ता, कुमठेकर रस्ता, लक्ष्मी रस्ता, शिवाजी रस्ता, मंडईचा परिसर या ठिकाणी सकाळपासूनच वाहतूक खोळंबली होती. दुपारनंतर गर्दी अधिक वाढत गेली. सायंकाळी गर्दीने उच्चांक गाठला होता. मुख्य रस्त्यांच्या भागातील गल्ल्यांमध्येही वाहतूक कोंडी झाली होती.

लक्ष्मी रस्त्यावरील साडय़ांची दालने, तयार कपडय़ांची दुकाने येथे खरेदीसाठी आलेल्या लोकांना कपडे दाखविणामध्ये विक्रेते मश्गूल होते. ग्राहकांना कपडे पसंत पडावेत यासाठी त्यांनी सारी कौशल्ये पणाला लावली. लक्ष्मी रस्त्याबरोबरच साडय़ांची विविध दालने असलेल्या कुमठेकर रस्त्यावरही गर्दी झाली होती. जणू पुरुषांचे कपडे लक्ष्मी रस्त्यावरील दुकानांतून, तर महिलांसाठी साडय़ांची खरेदी कुमठेकर रस्त्यावरील दालनांतून अशी धावपळ अनेकांना करावी लागली.

कपडे खरेदीबरोबरच दागिन्यांच्या खरेदीसाठी सराफांकडेही गर्दी होती. सोन्या-चांदीचे दागिने, कंठहार (नेकलेस), सोन्याची वळी खरेदी करण्यासाठी सराफांच्या दालनांमध्ये गर्दी झाली होती. मनसोक्त खरेदी करता यावी यासाठी अनेक घरांमध्ये स्वयंपाकाला सुटी देण्यात आली होती.

खरेदीतून सवड काढत पोटपूजा करण्यासाठी शहराच्या मध्यभागातील विविध हॉटेलमध्ये गेलेल्या लोकांना भोजनासाठी प्रतीक्षा करावी लागली. लक्ष्मी रस्त्याप्रमाणेच गणपती चौक आणि जोगेश्वरी मंदिराजवळील लहान मुलांच्या कपडय़ांची विक्री करणाऱ्यांकडे गर्दी झाली होती. शहरातील मॉल्स, ब्रँडेड कपडय़ांच्या दुकानांमध्येही गर्दी होती. मॉल्समधून दिल्या जाणाऱ्या विविध ऑफर्सनी ग्राहकांना आकर्षित केले होते.