मंदिरांची रंगरंगोटी, साफसफाई, विद्युत रोषणाई अशी कामे पूर्णत्वास नेत संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरमहाराज आणि संतशिरोमणी तुकाराममहाराज यांच्या पालखीच्या स्वागतासाठी पुण्यातील मुक्कामी तळ सज्ज झाले आहेत. सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून यंदा सीसीटीव्ही यंत्रणाही कार्यान्वित करण्यात आली आहे.
संत ज्ञानेश्वरमहाराजांची पालखी भवानी पेठेतील पालखी विठ्ठल मंदिर येथे तर, संत तुकाराममहाराजांची पालखी नाना पेठ येथील निवडुंग्या विठोबा मंदिरामध्ये मुक्कामास असते. या दोन्ही पालख्यांचे शुक्रवारी (१० जुलै) पुण्यनगरीत आगमन होत असून रविवारी (१२ जुलै) सकाळी पालखी प्रस्थान ठेवणार आहे. नाना पेठ आणि भवानी पेठ परिसरात वारकऱ्यांच्या स्वागतासाठी मांडव, कमानी, स्वागत फलक उभारण्यात आले असून विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.
निवडुंग्या विठोबा मंदिरामध्ये वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्यात आली आहे. आठ कॅमेरे बसविण्यात आले असून आणखी पाच कॅमेरे पालखी आगमनापूर्वी कार्यरत होतील. महापालिका प्रशासन आणि पोलिसांनी व्यवस्थेची पाहणी केली आहे. तुकाराममहाराज पालखी सोहळ्याचे यंदा ३५० वे वर्ष असल्याने वारकऱ्यांच्या संख्येमध्ये वाढ होण्याची शक्यता गृहीत धरून तयारी करण्यात आली आहे. दरवर्षीप्रमाणेच वारकऱ्यांसाठी अन्नछत्र आणि निवासव्यवस्था करण्यात आली आहे, अशी माहिती मंदिराचे व्यवस्थापक अनंत पाध्ये आणि रवींद्र पाध्ये यांनी दिली.
पालखी विठ्ठल मंदिरही रंगरंगोटी करून पालखीच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहे. पावसाची शक्यता ध्यानात घेऊन यंदा मोठय़ा संख्येने पत्र्याचे मंडप उभारण्यात आले आहेत. मंदिरामध्ये देवस्थानचे विश्वस्त, खांदेकरी आणि मानाचे वीणेकरी यांची निवास व्यवस्था करण्यात आली आहे. तर, वारकऱ्यांसाठी महापालिका शाळा, हमाल तालीम आणि कामगार मैदान येथे निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे. कचऱ्याचा प्रश्न गंभीर झाला असल्याने यंदा ‘स्वच्छता वारी’ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे, अशी माहिती भवानी पेठ पालखी विठ्ठल मंदिर ट्रस्टचे विश्वस्त गोरखनाथ भिकुले यांनी दिली.
————–
पुण्यातील पहिल्या वारकरी भवनाला निधीची प्रतीक्षा
– भवानी पेठ पालखी विठ्ठल मंदिर ट्रस्टचे पालकमंत्र्यांना साकडे
प्रतिनिधी, पुणे
भवानी पेठ येथील पालखी विठ्ठल मंदिर ट्रस्टच्या माध्यमातून साकारण्यात येत असलेल्या पहिल्या वारकरी भवनाचे काम पूर्णत्वास नेण्यासाठी निधीची प्रतीक्षा आहे. वारकरी भवनाच्या तळमजल्याचे बांधकाम झाले आहे. मात्र, उर्वरित तीन मजल्यांच्या बांधकामासाठी ट्रस्टला निधीची गरज असून त्यासाठी पालकमंत्री गिरीश बापट यांना साकडे घालण्यात आले आहे.
पालखी विठ्ठल मंदिर हा संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरमहाराजांच्या पालखीचा मुक्काम तळ आहे. गेल्या अनेक वर्षांपासून पालखी मुक्कामी असते. पालखीसमवेत येणाऱ्या वारकऱ्यांच्या निवासाची सोय करण्यासाठी मंदिराच्या परिसरात वारकरी भवन साकारण्याची ट्रस्टची कल्पना होती. त्यासाठी गिरीश बापट यांनी आमदार निधीतून दिलेल्या २५ लाख रुपयांतून काम सुरू करण्यात आले. मात्र, हा निधी केवळ तळमजल्यासाठीच खर्च झाल्यामुळे आता काम थांबले आहे. वारकरी भवन उभारण्यासाठी महापालिकेकडून तीन मजल्यांची परवानगी मिळाली आहे, अशी माहिती ट्रस्टचे विश्वस्त गोरखनाथ भिकुले यांनी दिली.
पुण्यामध्ये वेगवेगळ्या समाजाच्या धर्मशाळा असल्या तरी वारकऱ्यांच्या निवासाची सोय करण्यासाठी वारकरी भवन नाही. हे ध्यानात घेऊनच ट्रस्टने वारकरी भवन साकारण्याचे ठरविले. मात्र, उर्वरित कामाच्या पूर्ततेसाठी अजून किमान ५० लाख रुपयांच्या निधीची आवश्यकता आहे. वारकरी भवनाचे महत्त्व ध्यानात घेऊन हा निधी उपलब्ध करून देण्याविषयी पालकमंत्री गिरीश बापट यांना पत्र दिले आहे, असेही भिकुले यांनी सांगितले.
——————
आकाशवाणीतर्फे घरबसल्या वारीचा अनुभव
पालखी सोहळ्याचे दैनंदिन समालोचन यंदा श्रोत्यांना घरबसल्या ऐकता येणार आहे. आकाशवाणीतर्फे प्रथमच पुणे केंद्राचा २० जणांचा गट वारीमध्ये सहभागी होत असून त्यांचा अनुभव दररोज श्रोत्यांपर्यंत पोहोचविला जाणार आहे.
आकाशवाणीच्या ‘एअर स्टुडिओ ऑन व्हील्स’ या अत्याधुनिक गाडय़ा वारीचे वृत्तांकन करणार आहेत. गेली अनेक वर्षे पालखी सोहळ्यामध्ये सहभागी होत असलेल्या वारकऱ्यांच्या मुलाखती आणि वारीतील घडामोडी श्रोत्यांपर्यंत पोहोचविल्या जाणार आहेत. वारीचे वीस दिवस दररोज आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून सकाळी नऊ वाजल्यापासून अर्धा तास वारीचा वृत्तांत प्रसारित करण्यात येणार असून सायंकाळी साडेचार ते साडेसहा या वेळात धावते समालोचन ऐकविण्यात येणार आहे.
——————–
पालख्यांचे स्वागत, सत्कार
श्री संत ज्ञानेश्वरमहाराज पालखीचे स्वागत शुक्रवारी सकाळी अकरा वाजता आळंदी रस्ता येथील कळसगाव म्हस्के वस्ती येथे महापौर दत्तात्रय धनकवडे यांच्या हस्ते केले जाईल. तसेच श्री संत तुकाराममहाराज पालखीचे स्वागत पुणे-मुंबई रस्त्यावरील बोपोडी येथे सिग्नल चौकात दुपारी एक वाजता केले जाणार आहे. त्यानंतर पाटील इस्टेट येथे महापालिकेच्या स्वागत मंडपात दोन्ही पालख्यांबरोबर असलेल्या वीणेकऱ्यांचा सन्मान केला जाईल.
———–
पीएमपीच्या जादा गाडय़ा
पुणे शहर आणि उपनगरांमधून आळंदी तसेच देहू येथे जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी पीएमपीने जादा गाडय़ांची व्यवस्था केली असून पीएमपीच्या सर्व आगारांमधून या गाडय़ा सोडल्या जात आहेत. नेहमीच्या गाडय़ांव्यतिरिक्त आणखी ६५ गाडय़ा सोडण्यात आल्या आहेत.
———-
शहरात दिंडय़ांची निवास व्यवस्था
महापालिकेच्या अडोतीस शाळांमधील एकशेबावीस खोल्यांमध्ये तसेच परिसरातील मंदिरे, सभागृह, पार्किंगच्या जागा येथे दिंडय़ांची निवास व्यवस्था करण्यात आली असून आवश्यक सर्व सोयीसुविधा तेथे महापालिकेतर्फे दिल्या जाणार आहेत. या शिवाय शहरातील अनेक संस्था, मंडळांतर्फेही वारकऱ्यांच्या निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे.