अलंकापुरी भाविकांनी गजबजली
पालखीची नगर प्रदक्षिणा व विविध धार्मिक कार्यक्रमांच्या आयोजनातून संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींच्या पालखी सोहळ्याची शनिवारी उत्साही सांगता झाली. एकादशीच्या निमित्ताने माउलींच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी अलंकापुरी गजबजून गेली होती.
टाळमृदंगाचा गजर आणि माउलीनामाच्या घोषात पालखी दुपारी नगर प्रदक्षिणेस निघाली. प्रदक्षिणा मार्गावर ठिकठिकाणी भाविकांची गर्दी झाली होती. संजीवन समाधी मंदिरातही भाविकांनी दर्शनास गर्दी केली. एकादशी साजरी करीत विविध िदडय़ांनीही नगर प्रदक्षिणा केली. श्रींच्या पालखी सोहळ्याची सांगता परंपरेने हजेरी भजनासह नारळ प्रसाद देऊन झाली. आळंदीकर ग्रामस्थांतर्फे नारायण कुऱ्हाडे, श्रीधर कुऱ्हाडे, उपाध्यक्ष अंजना कुऱ्हाडे, सुरेश कुऱ्हाडे, चंद्रकांत कुऱ्हाडे, नगरसेवक राहुल चीतालकर पाटील आणि डॉ. नाईक यांच्या वतीने अरिफ शेख व शेख परिवाराने नारळ प्रसाद दिला. िदडी प्रमुख, मानकरी, श्रींचे चोपदार व मानकरी यांना आळंदी देवस्थानचे पदाधिकारी प्रमुख विश्वस्त अजित कुलकर्णी, विश्वस्त अभय टिळक आदींनी माउली मंदिरात श्रीफळ दिला. मानकरी योगेश सुरू, बाळासाहेब कुऱ्हाडे, मालक बाळासाहेब आरफळकर, राजेंद्र आरफळकर, श्रींचे सेवक चोपदार बाळासाहेब रणदिवे आदींना प्रसाद भेट दिला.
भाविकांना सुखकर सुलभ दर्शन व्यवस्थेचे नियोजन आळंदी देवस्थानने केले होते. समाधी मंदिराचा गाभारा मंदिर परिसर फुलांनी सजविण्यात आला होता. आळंदी परिसरातील रस्ते गर्दीने फुलले होते. शहरात वाहनांची गर्दी वाढल्याने काही वेळ वाहतुकीची कोंडी झाली. माउली मंदिपर्यंत थेट वाहने आल्याने भाविकांची परिसरात गरसोय झाली.