साक्षी महाराज प्रत्येक हिंदूला चार मुले व्हायला हवीत असे म्हणतात, तर शंकराचार्य प्रत्येक हिंदूला दहा मुले व्हायला हवीत असे म्हणतात. जोपर्यंत सरकार कुटुंब नियोजनाबद्दल सर्वाना समान कायदा लागू करत नाही तोपर्यंत हा नारा देत राहायला हवे, असे सांगत हरिद्वारच्या परमार्थ निकेतनचे स्वामी चिन्मयानंद यांनी साक्षी महाराजांच्या वक्तव्याचे समर्थन केले. ‘‘एका समुदायाची २४ टक्के लोकसंख्या केवळ दहा वर्षांत वाढलेली असू शकते. मग हिंदूंनी केवळ दोनच मुले का जन्माला घालायची,’’ असा प्रश्न करण्यासही ते विसरले नाहीत.
विश्व हिंदू परिषदेच्या सुवर्ण जयंती महोत्सवानिमित्त संघटनेने रविवारी ‘हिंदू संमेलना’चे आयोजन केले होते. या वेळी चिन्मयानंद यांच्यासह बहुतेक वक्त्यांनी घरवापसीबरोबर राममंदिराचा नारा दिला.
घरवापसीचेही समर्थन करत चिन्मयानंद म्हणाले, ‘‘घरवापसी हे धर्मातर नसून गंगेचे अशुद्ध झालेले पाणी पुन्हा शुद्ध करण्यासारखे आहे. मी केंद्रात गृह राज्यमंत्री असताना माझ्याकडे ईशान्य भारतातील राज्यांची जबाबदारी होती. ईशान्य भारतातील ७ राज्यांमधील सर्व जमातींमधील लोक ख्रिश्चन बनले.  देशातून नक्षलवाद नष्ट करायचा असेल आणि राष्ट्रवादी विचारांचे लोक एकत्र व्हायला हवे असतील तर घरवापसी व्हायला हवी’.