खासगी डॉक्टरांवर होणाऱ्या हल्ल्यांच्या विरोधात आता डॉक्टर संघटनांनी स्वतंत्र उपाय योजायला सुरुवात केली आहे. ‘इंडियन मेडिकल असोसिएशन’च्या पुणे शाखेने अशा प्रकारच्या घटना हाताळण्यासाठी शहरात बारा ‘रश टीम्स’ बनवल्या असून एक महिन्यापासून या टीम्स सज्ज झाल्या आहेत.
आयएमएच्या पुणे शाखेचे अध्यक्ष डॉ. अविनाश भुतकर यांनी ही माहिती दिली. एखाद्या रुग्णाच्या मृत्यूनंतर नातेवाइकांना दु:ख होणे, चिडून जाणे स्वाभाविक असले, तरी डॉक्टरांना शारीरिक इजा करणे किंवा दवाखान्यातील सामानाची तोडफोड करणे योग्य नाही, असे मत भुतकर यांनी व्यक्त केले. ते म्हणाले, ‘रुग्णांच्या जवळच्या नातेवाइकांपेक्षा त्यांच्याबरोबर येणाऱ्या इतर व्यक्तींकडून असे कृत्य घडताना अनेकदा दिसून येते. एकदम चाळीस-पन्नास व्यक्तींचा जमाव येतो आणि एकटा डॉक्टर किंवा त्याच्या हाताखालचे कर्मचारी काहीही करू शकत नाहीत. उपचारादरम्यान उद्भवू शकणाऱ्या गुंतागुंती अशा वेळी विचारात घेतल्या जात नाहीत. अशा प्रसंगी अनुचित प्रसंग टाळण्यासाठी या टीम काम करतील. पोलिस आयुक्तांनी या बाबत संघटनेला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.’ ‘न्यायवैद्यकीय प्रकरणांमध्ये डॉक्टरवर खटला चालून तो दोषी आढळल्यास योग्य ती कारवाई जरूर व्हावी, पण रुग्णाच्या नातेवाइकांनी डॉक्टरला मारहाण करणे हे उत्तर नव्हे,’ असे मत आयएमएच्या पुणे शाखेचे प्रवक्ते डॉ.  जयंत नवरंगे यांनी सांगितले.
पुण्यातील पोलिसांच्या हद्दीनुसार या डॉक्टरांच्या टीम बनवण्यात आल्या असून प्रत्येक टीमचा एक प्रमुख आणि टीमचे स्वतंत्र व्हॉट्स अप ग्रुप उघडण्यात आले आहेत. या टीमनी आपापल्या भागातील पोलिस चौक्यांवर जाऊन तिथल्या अधिकाऱ्यांशी ओळख करून घ्यायची आणि चौकीचे दूरध्वनी क्रमांक प्रत्येक खासगी डॉक्टर व रुग्णालयाकडे उपलब्ध करुन द्यायचे,अशी ही योजना आहे. भुतकर म्हणाले, ‘एक महिन्यापूर्वी सांगवीत एका लहान मुलाच्या मृत्यूनंतर डॉक्टरांना दूरध्वनीवर काही जणांनी दमदाटी केली. ते लोक रुग्णालयात येण्याच्या वेळी आयएमएचे ३० ते ४० सदस्य दवाखान्यात केवळ उपस्थित राहिले आणि अनर्थ टळला.’