कॅबचालकासह साथीदाराविरुद्ध गुन्हा
पत्नीला भेटण्यासाठी परगावी निघालेल्या डॉक्टराला कॅबचालक आणि त्याच्या साथीदाराने मारहाण करून रोकड, सोनसाखळी, अंगठी असा एक लाख ४२ हजार रुपयांचा ऐवज लुटून नेला. वेधशाळा चौकात शनिवारी (२५ जून) मध्यरात्री ही घटना घडली.
डॉ. संतोष वळसंगे (वय ३३, रा. शिरूर) यांनी यासंदर्भात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी कॅबचालक आणि त्याच्या साथीदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. वळसंगे हे हडपसर येथील मगरपट्टा येथील रुग्णालयात काम करतात. डॉ. वळसंगे यांची पत्नी औरंगाबाद येथे पदव्युत्तर शिक्षण घेत आहे. शनिवारी रात्री ते पत्नीला भेटण्यासाठी औरंगाबाद येथे निघाले होते.
शिवाजीनगर एसटी स्थानकाच्या परिसरात त्यांना कॅबचालकाने अडविले. कोठे जायचे आहे, अशी विचारणा कॅबचालकाने त्यांच्याकडे केली. औरंगाबादला निघालो असल्याचे डॉ. वळसंगे यांनी त्याला सांगितले. त्यानंतर मीदेखील औरंगाबाद येथे निघालो आहे, अशी बतावणी कॅबचालकाने केली.
डॉ. वळसंगे यांना कॅबमध्ये बसण्यास सांगितले. कॅबमध्ये आणखी एकजण होता. शिवाजीनगर एसटी स्थानकाच्या परिसरातून कॅब वेधशाळा चौकात (सिमला ऑफीस) आली. कॅबचालकाने गाडी रस्त्याच्या कडेला थांबविली. डॉ.वळसंगे यांना जीवे मारण्याची धमकी देऊन कॅबचालक आणि त्याच्या साथीदाराने त्यांच्याकडील सहा हजारांची रोकड, सोनसाखळी आणि अंगठी असा ऐवज काढून घेतला.
त्यांना वेधशाळा चौकात सोडून कॅबचालक आणि त्याचा साथीदार पसार झाला. त्यानंतर डॉ. वळसंगे यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक काळे तपास करत आहेत.