‘मार्ड’ (महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेसिडंट डॉक्टर्स) या निवासी डॉक्टरांच्या संघटनेने राज्यभरातील १४ वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये सुरू केलेल्या संपाचा शनिवारी दुसरा दिवस आहे. निवासी डॉक्टरांनी अत्यावश्यक वैद्यकीय सेवा पुरवणे बंद केले नसल्याचे संघटनेने स्पष्ट केले असून पुण्यातील ससून रुग्णालयातही या डॉक्टरांकडून अत्यावश्यक सेवा सुरू आहे. शनिवारपासून हे डॉक्टर समांतर बाह्य़ रुग्ण विभाग सुरू करण्याची किंवा नेहमीच्या बाह्य़ रुग्ण विभागातील सेवा सुरू करण्याची शक्यता आहे.
मुंबईच्या जे. जे. रुग्णालयातील अधिष्ठाता डॉ. तात्याराव लहाने आणि नेत्रविकार विभागाच्या प्रमुख डॉ. रागिणी पारेख यांच्या बदलीची मागणी करत मार्डने संप सुरू केला आहे. वैद्यकीय शिक्षणात प्रत्यक्ष अनुभव मिळत नसल्याचा तेथील डॉक्टरांचा आक्षेप आहे.
ससूनमधील निवासी डॉक्टर व ‘मार्ड’चे उपाध्यक्ष डॉ. नीलेश बाष्टेवाड म्हणाले, ‘संघटनेचा संप सुरू असून अत्यावश्यक वैद्यकीय सेवा सुरू ठेवली जाईल. ससून रुग्णालयाच्या आवारात शनिवारी सकाळपासून आम्ही समांतर बाह्य़रुग्ण विभाग सुरू करण्याच्या विचारात आहोत, परंतु समांतर ओपीडीसाठी जागा न मिळाल्यास निवासी डॉक्टर नेहमीच्या ओपीडीतच बसतील. ओपीडी ही देखील अत्यावश्यक सेवाच आहे.’
रुग्णालयाने संपकाळासाठी पर्यायी व्यवस्था केली असून वैद्यकीय सेवेवर परिणाम न झाल्याचे ससून प्रशासनाने सांगितले.