सोशल मीडियाचा अचूक वापर केल्यामुळे भाजपला प्रचंड असे बहुमत लोकसभा निवडणुकांमध्ये मिळाले. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकांमध्येही भाजपला चांगले यश मिळाले, आता जीएसटीच्या अर्थात वस्तू आणि सेवा कराच्या मुद्द्यावरून मात्र हाच सोशल मीडिया भाजपसाठी डोकेदुखी ठरल्याचे चित्र दिसून येते आहे. कारण व्हॉट्स अॅप आणि फेसबुक या दोन्ही माध्यमांच्या साथीने सोशल मीडियावर जीएसटी संदर्भात विविध प्रकारची चुकीची माहिती पसरवली जाते आहे, ज्यामुळे जनतेच्या मनात भ्रम निर्माण होतो आहे, असे मत अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पिंपरीमध्ये व्यक्त केले आहे.

पिंपरी चिंचवडच्या डेरी फार्म या ठिकाणी त्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले, त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. राज्यात सध्या वृक्ष लागवडीसाठी राज्य सरकारने मोठी मोहिम हाती घेतली आहे. संपूर्ण राज्यात १ कोटी ५० लाखांपेक्षा जास्त झाडे लावण्याचा उपक्रम राज्य सरकारने हाती घेतला आहे. सरकार हे लक्ष्य गाठण्यात यशस्वी होईल असेही मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले आहे.

तसेच देशात जीएसटी हा कर लागू झाला असून त्याबाबत सोशल मीडियावर विविध प्रकारचे मेसेज फिरत आहेत. या मेसेजेसमधून काय महाग होईल काय स्वस्त होईल याची पडताळा नसलेली यादी शेअर होते आहे. ही बाब निश्चितच चिंतेची आहे, सोशल मीडियावर आलेल्या या अफवांवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये असेही आवाहन मुनगंटीवार यांनी केले आहे. सोशल मीडियाचा वापर चांगल्या कामासाठी व्हायला हवा, मात्र GST सारख्या महत्त्वाच्या कराबाबत बिनदिक्कतपणे अफवा पसरवल्या जात आहेत ही बाब निश्चितच दुर्दैवी आहे असेही मत त्यांनी व्यक्त केले आहे.