गुणवत्ता याद्या तपासून न घेणाऱ्या महाविद्यालयांना तंत्रशिक्षण विभागाने दणका दिला असून या महाविद्यालयांचे निकाल अडवण्याच्या सूचना विद्यापीठांना केल्या आहेत. तंत्रशिक्षण संचालनालयाने प्रसिद्ध केलेल्या यादीतील सर्वाधिक महाविद्यालये ही सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न आहेत.
राज्यातील अभियांत्रिकी, औषधनिर्माण, व्यवस्थापन आणि वास्तुकला महाविद्यालयांतील प्रवेश झाल्यानंतर प्रत्येक महाविद्यालयाने तंत्रशिक्षण संचालनालयाकडून गुणवत्ता याद्या तपासून प्रवेशासाठी मान्यता घेणे अपेक्षित असते. मात्र, अनेक महाविद्यालयांनी २०१३-१४ आणि २०१४-१५ या वर्षांच्या गुणवत्ता याद्या तपासून न घेतल्याचे समोर आले आहे. अशा महाविद्यालयांचे अंतिम निकाल अडवण्यात यावेत अशा सूचना तंत्रशिक्षण विभागाने विद्यापीठांना दिल्या आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर आणि सोलापूर विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांची यादी विभागाने जाहीर केली आहे. ‘या संस्थांमध्ये अपात्र विद्यार्थ्यांना प्रवेश दिलेला असण्याची शक्यता असल्यामुळे या महाविद्यालयांचे निकाल जाहीर करण्यात येऊ नयेत’, असे तंत्रशिक्षण विभागाने विद्यापीठांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.
गुणवत्ता याद्या न तपासलेल्या महाविद्यालयांमध्ये पुण्यातील महाविद्यालये सर्वाधिक आहेत. तंत्रशिक्षण विभागाच्या या पत्रामुळे पुण्यातील २३ व्यवस्थापन अभ्यासक्रम संस्था, ६ अभियांत्रिकी महाविद्यालये, २ औषधनिर्माण महाविद्यालये, ५ वास्तुकला महाविद्यालये यांच्या निकालावर टांगती तलवार आहे.